वं. दादांचे कौटुंबिक जीवन:

1. वं. दादांचे बालपण

वं. दादा तरूणपणीचा फोटो

वंदनीय दादांचे संपूर्ण नाव दत्तात्रय भास्कर भागवत. त्यांचे मूळगाव सातारा जिल्ह्यातील धावडशी असून ते साता-यात रहात होते. घरात एकूण अकरा भावंडे होती. वं. दादा सर्वात मोठे. चार बहिणी व सात भाऊ असे कुटुंब होते. त्यांचे वडील ‘दत्तात्रय मोटार सर्व्हिस’ या नावाने प्रवासी बस गाड्यांचा व्यवसाय करीत असत. ते रोज देवपूजा, गुरूचरित्र, श्रीनवनाथ पोथीचे वाचन करीत. पारायणे करीत. गावातील भैरोबाच्या दर्शनास रविवारी जात. वं. दादांच्या घरी बालविधवा अशा त्यांच्या काकू रहात होत्या. त्यांचे भाऊ मेजर गुणे, यांनी वं. दादांना या कार्यात उत्तम मार्गदर्शन केले. ते लंडनमधील ‘स्पिरीच्युअल सोसायटीचे’ सभासद होते. आज आपण म्हणत असलेली दैनंदिन प्रार्थना ‘हे भगवंता नारायणा......’ व ‘परमार्थ प्रश्नावली’ त्यांनी 1935 साली लिहिली.

वंदनीय दादांचे कुटुंब
वंदनीय दादा व मेजर गुणे

2. तेली महाराजांचा आशिर्वाद

वं. तेली महाराज
वं. दादांच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती बिकट होती. तरी त्यांनी औदुंबर उपासना चालू ठेवली होती. एके दिवशी त्यांची तेली महाराजांशी भेट झाली. त्यांनी सांगितले रोज मला जेवू घालीत जा. ते जेवण तुझ्या मोठ्या मुलाबरोबर पाठव. त्या दिवशी नेलेले डब्यातील अन्न त्याच दिवशी ते कधीच खात नसत. आठ दिवस ठेवलेले अन्नाचे डबे उघडले असता आताच स्वयंपाक करून ठेवलेल्या अन्नाइतके ते ताजे असे. अण्णा, वं. दादांचे वडील सांगत, तेली महाराजांना अन्नब्रह्माचा आशीर्वाद होता. तो आशीर्वाद वं. दादांना मिळाल्यामुळे केंद्रावर येणा-या भक्तभाविकांपर्यत तो पोहोचला व भक्तांना खाण्यापिण्याला कधीच कमी पडले नाही. वं. दादांच्या वडीलांची, अण्णांची व्यवसायाची घडी बसल्यावर त्यांनी अनेक बसेस खरेदी केल्या, व आता असलेले सातारचे घर बांधले. त्या दरम्यान वं. दादांच्या दोन बहिणींची लग्न झाली. सर्वात मोठ्या बहिणीचा विवाह श्री शहाणे यांच्याशी व तिच्या पाठच्या बहिणीचा विवाह श्री ठकार यांच्याशी झाला.

अण्णांच्या परोपकारी स्वभावामुळे त्यांनी अनेक आप्तस्वकीयांना आधार दिला. कालान्तराने अण्णांना त्यांच्या व्यवसायात आर्थिक नुकसान सोसावे लागले. त्यामुळे वं. दादा त्यांचे मामा जनुमामा पंडितांकडे पुण्याला शिकण्यास गेले. त्या दरम्यान दुस-या महायुध्दामुळे महागाई वाढली. आर्थिक विवंचना वाढली म्हणून वं. दादा परमेश्वरावर श्रद्धा ठेवून सैन्यात दाखल झाले. वं. दादांसोबत त्यांचे धाकटे बंधू हरिभाऊसुध्दा सैन्यात दाखल झाले व दुसरे बंधू श्री विठ्ठल यांनी पोलिस खात्यात नोकरी करुन घरखर्चाची घडी बसवली.

वं. दादा सैन्यातील नोकरी निमित्ताने इराक येथे गेले. तेथील बगदाद, करबाला ह्या पवित्र स्थानांचे त्यांनी दर्शन घेतले. पाच वर्षे महायुध्द संपेपर्यंत वं. दादा इराकमध्येच होते. या काळात त्यांची खुशाली कळण्यास काहीच मार्ग नसे. अशा वेळी अण्णा श्री नवनाथ पोथीचे पारायण करीत व दादांच्या खुशालीचे पत्र येई.
वं. दादा सैन्यात




वं. दादा तरूणपणीचा फोटो
दुसरे महायुध्द संपल्यावर वं. दादांनी मिलिट्रितून निवृत्ती घेतली व पुण्यात ‘फोटो झिंको‘ कंपनीत नोकरीस लागले. त्यानंतर त्यांचा विवाह सातारा येथील श्री देऊसकर यांची कन्या सिंधू यांच्याशी 7 मार्च 1949 रोजी झाला. लग्नानंतर वं. दादा व सौ. वहिनी शिवाजीनगर पुणे येथे राहू लागले. तेथेच त्यांनी (श्री भैरव नाथांच्या आज्ञेवरून) प. पू. श्री साईनाथ महाराजांचा फोटो आणून सेवा सुरू केली. तोपर्यंत वं. दादांनी शिर्डी पाहिलीसुध्दा नव्हती.
या दरम्यान कौटुंबिक स्थिती बिकटच होत चालली होती. सरकारी धोरणामुळे खाजगी वाहतूक व्यवसाय बंद पडले. अण्णांचे अतोनात नुकसान झाले. त्यांना दम्याचा विकार जडला. प्रपंच चालविणे अवघड झाले. त्यामुळे त्यांच्या वं. दादांच्या भगिनी लीलाताई व नलूताई यांचे इयत्ता सातवीतच शाळेतून नाव काढावे लागले. वं. दादांचे बंधू श्री. राम व श्री. लक्ष्मण यांचे शिक्षण शहाणे यांच्या मदतीने झाले. घर चालविण्यासाठी लीलाताई व ती. काकी यांनी अनेक लहान-सहान उद्योग केले. या परिस्थितीतही घरातील कोणीही देवधर्म, साधना ह्यात खंड पडू दिला नाही. ती. अण्णांनी लीलाताईंना वयाच्या तेराव्या वर्षापासूनच श्रीनवनाथ पोथीची पारायणे करण्यास सांगितले.
या काळात वं. दादांच्या कार्यास प्रारंभ झाला. निराकरणांच्या सिद्धतेसाठी त्यांची साधना चालू होती. निराकरण केल्यानंतर त्यातील एक पैसाही घरासाठी न घेण्याची प. पू. बाबांची आज्ञा होती. त्यामुळे घरातील आर्थिक परिस्थितीत फरक पडत नव्हता. 1955 साली वं. दादांना पितृवियोगाचे दुःख सोसावे लागले वं. दादाच्या संसारात गोपाळ, पद्मा, भानुमती या मुलांचाही प्रवेश झाला. कुटुंबात जरा स्थैर्य निर्माण झाले. वं. दादांचे बंधू श्री. लक्ष्मण हे पुणे केंद्र व श्री. राम हे मुंबई येथील केद्राची जबाबदारी पाहू लागले. वं. अण्णांच्या पश्चात वं. दादा, ती. आई, ती. काकी, तांबेकाकू, गिजरे या जेष्ठांना घेऊन काशी, गाया येथे जाऊन आले.
वं दादांनी 1956 साली विजयादशमीला ‘श्री साई आध्यात्मिक समितीची’ स्थापना केली व कार्य विस्तारित केले. वं. दादा प्रापंचिक कर्तव्याची जबाबदारी पार पाडीत असताना प. पू. बाबांच्या आज्ञेचे पालन करणे याला नेहमीच अग्रस्थान देत असत. पुण्यात प्रभात रोड येथे द्वारकामाई येथे स्थलांतर केले. वं. दादांनी आपल्या धाकट्या बंधू भगिनींचे योग्यवेळी विवाह करून दिले. संपूर्ण भागवत कुटुंबियांचे एकत्र संमेलनच जणू वं. दादा दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत घेत. त्यात सर्वांना सामावून घेत. अशी कुटुंबवत्सल भूमिका ही त्यांनी लीलया पार पाडली.
1964 साली वं. दादांना गंडांतर होते, ते प. पू. बाबांच्या कृपेने टळले व वं. दादांना नवजीवन मिळाले. ते जीवन त्यांनी अधिक जोमाने कार्याला अर्पण केले.
वं. दादा कार्याच्या प्रसारार्थ पादूका स्थापन करण्यासाठी म्हणून लंडन येथे जाऊन आले तेथून परत आल्यावर त्यांना मातृवियोग सहन करावा लागला. परंतु त्यांचे कार्य अविरत चालू होते. 1982 साली त्यांनी ‘श्री साईशक’ चा प्रारंभ केला.
अशा रितीने लोककार्यार्थ व्यस्त असतांना त्यांना आपले जीवितकार्य पूर्ण झाल्याची आज्ञा झाली. 1 जुलै 1991 रोजी मध्यरात्री 1 वाजून 40 मिनिटांनी वं. दादांनी, त्यांचे परमशिष्य दीपकदादांच्या खांद्यावर मान ठेवून देहत्याग केला.
© www.श्री साईलीला.net all rights reserved to ।। साई अनुग्रहीत सेवा संस्था ।।