कार्यकेंद्राची स्थापना :

1.दिल्ली येथील कार्यकेंद्राचा विस्तार


दिल्ली येथील श्री विजय वर्मा यांनी तेथे कार्यकेंद्र व्हावे यासाठी सौ. लीलाताईंकडून मार्गदर्शन घेतले. प. पू. बाबांच्या मार्गदर्शनानुसार त्या केंद्राचे नामकरण ‘साई निकेतन’ असे केले. कारण महाराष्ट्रातील असणा-या केंद्राच्या संस्थेशी ते संलग्न ठेवता येत नव्हते. या केंद्राच्या बांधकामाच्या वेळी आलेली मोठी अडचण कशी सहजगत्या निवारण झाली याची हकीकत श्री. बाबूजी (विजय वर्मा) यांनी सांगितली की ‘बांधकामास सुरवात झाली. बांधकामाचे साहित्य येऊन पडले होते त्या ठिकाणी रात्री बाराच्या सुमारास एक मोठा नाग दिसला. तो इतका प्रचंड होता की त्याच्या फण्याची रूंदी एक फूट, वेटोळ्याचा घेर दीड ते दोन फूट असेल. त्याच्या फुत्काराचा आवाजही खूपच मोठा होता. त्याचे हे प्रचंड रूप बघून कामगारांनी काम करण्यास नकार दिला. तेव्हा श्री बाबूजींनी सौ. लीलाताईंना निराकरण विचारले. त्यावर त्यांनी नागासमोर प्रार्थना करण्यास सांगितले की, ‘येथे बाबांची वास्तू होणार आहे तू येथून निघून जा.’ अशी प्रार्थना केल्यावर तो लगेच निघून गेला. कारण तो नाग म्हणजे साधासुधा नाग नसून तो त्या भूमीचा मूळ पुरूषच होता. नंतर पुढील काम विनाअडचण पूर्ण झाले. मात्र विशेष म्हणजे काम पूर्ण झाल्यावर तेथे पूजा झाली तेव्हा तो नाग फोटोसमोर मोठा फणा काढून येऊन उभा राहिला व निमूटपणे निघून गेला. तो आजतागायत आला नाही. म्हणजे त्याला मुक्तीच मिळाली.

दिल्ली येथे ‘साईकल्प’ या नावाने ट्रस्टही स्थापन केला. तो आजही उत्तम त-हेने चालू आहे. दिल्लीचे केंद्रप्रमुख श्री विजय वर्मा आजही सौ. लीलाताईंचे मार्गदर्शन घेत कार्य वृध्दिंगत करीत आहेत.


2. पुणे येथील कार्यकेंद्राचा विस्तार


पुणे येथे कार्यकेंद्र असावे अशी वं. दीपकदादांची इच्छा होती. ती 29 मार्च 2003 रोजी पूर्ण झाली. पुणे येथील वारजे येथे प्लॉट घेऊन कार्यकेंद्राची उभारणी झाली. या कार्यकेंद्राच्या इमारतीचे बांधकाम रात्रंदिवस एक करून पूर्ण केले. या केंद्रासाठी वं. दीपकदादांनी ठेवलेल्या चारही प्रतिमा व साईनाथ महाराजांचा टाक पूजनात ठेवला.


‘साईदीप’ या पुणे येथील कार्यकेंद्रावर साधना-आरती चालू असताना सौ. लीलाताईंना श्रीसद्गुरूनाथ दादा व श्री साईनाथ महाराज यांची अशी आज्ञा झाली की दासमारूतीची हनुमानजयंतीला स्थापन्न होणे आवश्यक आहे. त्यानुसार हनुमानजयंतीला श्री मारूतरायाची रूद्राभिषेक करून प्रतिष्ठापना केली गेली. मारूतीची सेवा वं. दादांच्या घरी पाच पिढ्यांपासून आहे. वं. दादांचे वडील साता-यात हनुमानजयंती साजरी करीत असत. ती मुर्ती वं. दादांच्या पणजीशी बोलत असे. ती हनुमानाची मुर्ती वं. दादांनी द्वारकामाई मध्ये ठेवली आहे. श्री नवनाथांचे दैवतसुद्धा मारूती आहे. वं. दादांनी सांगितले आहे की ‘आजपर्यंत आपण ओमकार साधना करीत आलो पण वाणीची सिद्धता असल्याशिवाय त्याचे फळ स्वतःला मिळत नाही व इतरांनाही देता येत नाही म्हणून प. पू. बाबांच्या आज्ञेने मारूती स्तोत्राचा समावेश नित्यसाधनेत देहिक व आत्मिक विकास होण्यासाठी केला.’

पुणे केंद्र येथील श्री मारूती

3. सातारा येथील केंद्र स्थापना


सातारा येथे वं. दादांचे जे घर होते त्या ठिकाणी वं. दादांचा पुतण्या श्री. गुरूदास भागवत आज राहतात त्यांनी सौ. लीलाताईंच्या मार्गदर्शनानुसार तेथे कार्यकेंद्र स्थापन केले व तेथे वं. दादांच्या पादुकांची स्थापना केली. साता-यातील या वास्तुला वं. दादांचे जन्मस्थान म्हणून स्थान-महात्म्य आहे. आणि म्हणून त्या वास्तूचे नूतनीकरण करून तेथे कार्यकेंद्र करावे असे श्री. गुरूदासला मार्गदर्शन केले गेले. पण हे प्रत्यक्षात येणे अतिशय अवघड होते. कारण त्यासाठी त्या वडिलोपार्जित वास्तुवरील आपला हक्क सोडण्यासाठी वं. दादांच्या आज हयात असलेल्या एकूण पंचवीसपेक्षा जास्त वारसदारांची सही आवश्यक होती. एकूण हे संपूर्ण काम किचकट वेळखाऊ व सहज न होण्यातील होते. मात्र सौ. लीलाताईंच्या मार्गदर्शनानुसार या कामाची कायदेशीर पूर्तता करण्यासाठी श्री गिरीश कुलकर्णी यांनी अथक प्रयत्न केले. पावलोपावली नियम आडवे येत होते. कुठे जबर दंड आकारात जाण्याची शक्यता होती. परंतु एक-एक अडचणीचे निवारण झाले व 28 जुन 2007 रोजी वं. दादांच्या पादुकांची स्थापना केली. आज तेथील कार्यकेंद्रावर अनेक भक्तभाविक पादुकादर्शनाचा लाभ घेतात.

4. डोंबिवली येथील कार्यकेंद्राचा विस्तार


डोंबिवली येथील गुरूबंधू श्री विजय गाडगीळ यांच्या निवासस्थानी कार्यकेंद्र सुरू केले व त्यामुळे ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर या परिसरातील लोकांची फार मोठी सोय झाली. डोंबिवली केंद्रावर कामकाजासाठी व आरती-अनुष्ठानासाठी येणा-या भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. श्री गाडगीळ यांच्या निवासस्थानी असलेल्या कार्यकेंद्राची जागा अपुरी पडू लागली. परंतु नवीन वास्तू उभी करणे फार अवघड, किंबहूना अशक्यच वाटत होते परंतु सौ. लीलाताईंच्या मार्गदर्शनानुसार नवीन जागेचा शोध घेण्यास सुरूवात केली. आणि अवघड गोष्ट शक्य होऊन ‘साई-लीला‘ या देखण्या कार्यकेंद्राची उभारणी झाली. या कार्यकेंद्राचे स्थानांतरण 29 नोव्हेंबर 2008 रोजी झाले. आज त्या ठिकाणी अनेक भक्तभाविक आरती, अनुष्ठान, मुलाखत कामकाजासाठी नियमितपणे येतात व मार्गदर्शन घेतात. दिवसेंदिवस येथे येणा-या भक्तांच्या संख्येत वाढच होत आहे.

5. जयपूर येथील कार्यकेंद्राचा विस्तार


दोन-तीन वर्षांपूर्वी दिल्ली केंद्राचे प्रमुख श्री विजय वर्मा यांनी जयपूर येथे कार्यकेंद्र व्हावे अशी इच्छा सौ. लीलाताईंकडे व्यक्त केली व त्यानुसार त्यांचे मार्गदर्शन घेऊन तेथे कार्यकेंद्राचा प्रारंभ केला. त्यासाठी त्यांना ‘साईश्रद्धा अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्ट’ स्थापन करण्यास सांगितले. जयपूर येथे त्यांनी भव्य वास्तू उभी केली. तिचे नामकरण ‘द्वारकामाई’ असे केले. या कार्यकेंद्रात श्री गोरखनाथ, वं. दादा श्री साईबाबा, श्री पंतमहाराज यांच्या फोटोंबरोबर काळ्या दगडी दासमारूतीची मूर्ती स्थापन केली. हा वास्तुसोहळा 2 डिसेंबर 2009 रोजी पौर्णिमेला संपन्न झाला.

श्रीसद्गुरूनाथ दादांनी ज्या कार्याची मुहूर्तमेढ रोविली ते कार्य त्यांच्याच पद्धतीने त्यांच्या पश्चात तितक्याच समर्थपणे चालविले जात आहे. निरनिराळ्या ठिकाणी कार्यकेंद्राची उभारणी करून भक्तांच्या अडचणींचे निराकरण केले जात आहे.
© www.श्री साईलीला.net all rights reserved to ।। साई अनुग्रहीत सेवा संस्था ।।