वं. दादांबरोबर सौ. लीलाताईंचा प्रत्यक्ष कार्यातील सहभाग
वं. दादांबरोबर सौ. लीलाताईंचा प्रत्यक्ष कार्यातील सहभाग:
या कार्यात परलोकाचा अभ्यास करण्यासाठी व त्या अनुभवांचा पडताळा घेण्यासाठी वं. दादांना मध्यस्थाची गरज होती. त्या मध्यस्थाची जबाबदारी वं. दादांच्या आज्ञेने सौ. लीलाताईंनी स्वीकारली व त्यांच्या माध्यमाव्दारे वं. दादांनी कार्य करण्याचे ठरविले. त्यानुसार वं. दादांनी सौ. लीलाताईंना साधनेची ओळख करून दिली. इहलोक व परलोक म्हणजे काय याचे त्यावेळी सौ. लीलाताईंना ज्ञान नव्हते. तसेच वं. दादांना परकायाप्रवेश म्हणजे काय अवस्था आहे हे माहित नव्हते. वं. दादा व सौ. लीलाताई श्रीक्षेत्र औदुंबर येथे गेले असताना दुपारची महापूजा, होऊन आरतीला सुरूवात झाली असताना अचानकपणे सौ. लीलाताईंना वेगळाच अनुभव आला. त्यांच्या माध्यमातून एका आत्म्याने प्रवेश करून वं. दादांना तुम्ही आम्हाला मुक्त करण्यासाठी आला आहात हा दिवस आमच्या भाग्याचा आहे असे सांगितले. तेव्हा सौ. लीलाताईंना वं. दादांनी विचारले, ‘‘तु आणखी काय पाहिलेस ?’’ त्यावेळी त्यांनी सांगितले की ‘मी तिष्ठत असलेले आत्मे पाहिले.’ आरती ऐकत असताना डोळे बंद होऊन आरतीचे शब्द ऐकू येईनासे झाले. व मी वर वर चालले आहे असा भास झाला. शेवटी आपले जग आहे तसेच जग मला दिसू लागले. ह्या प्रकाशामुळे आपली सृष्टी निर्माण झाली आहे. परलोकात सात रंग असून ते रंग इंद्रधनुष्याप्रमाणे आपल्याला भासतात. ह्याचा अर्थ सप्तलोक म्हणून जे आपण म्हणतो, त्यांची ओळख ह्या सप्तरंगामुळे कळते. प्रत्येक लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा रंग आहे. त्यामुळे आत्म्याला (स्पिरीट) आपले स्थान कोणत्या रंगात आहे ते समजते. परलोकातील आत्मे इहलोकात येऊन त्यांच्याशी विचारविनिमय झाल्यानंतर ते आपापल्या ठिकाणी परत न जाता प्राप्त झालेला जो रंग म्हणजे आत्म्याचे स्थान, त्या पलिकडे अधिक उच्चस्थान ते प्राप्त करून घेत असतात. म्हणजेच त्यांचा संबंध इहलोकाशी आल्यानंतर त्यांची अवस्था आपल्या कृपाशिर्वादाने बदलते.
औदुंबराला आरती चालू असतांना सौ. लीलाताईंच्या माध्यमात ज्यांचा संचार झाला होता ते भिलवडीत’ वं. दादांच्या मामांकडे (गुणे मामा) पुन्हा सौ. लीलाताईंच्या माध्यमात आले. व सांगितले “मरणोत्तर जीवनामध्ये आत्म्याला जी अवस्था प्राप्त होते, तेथून सद्गती प्राप्त होणे हे सोपे नाही.” जेव्हा मनुष्य इहजगतात मरतो तेव्हा त्याचे श्राध्द कुटुंबिय करीत असतात. परंतु ते श्राध्द एकाचे नसून त्यावेळी तीन आत्म्यांना बोलाविले जाते. म्हणजे पितृत्रयी ही श्राध्दास उपस्थित पाहिजे. व असे श्राध्द केले असता जी पितृत्रयीच्या आधीची मागील चौथी पिढी आहे ती मुक्त होते. हा क्रम वेदशास्त्राने विधीमध्ये लिहीला आहे. पण यातील विधी अंधश्रध्देने केले जातात. त्यातून आवश्यक ते कार्य न झाल्याने आत्म्याला मुक्ती मिळत नाही. म्हणून मरणोत्तर जीवनात अडकलेल्या आत्म्यांना सुलभ मार्ग गुरूंच्या मार्गदर्शनाने मिळावा हे सांगण्यासाठी मी आलो आहे.’
त्यासाठी वंशविमोचन हा विधी संकल्पाने सिध्द करण्याची आज्ञा प. पू. बाबांनी वं. दादांना दिली. त्यानुसार हाजीमलंग येथे केलेल्या वंशविमोचनाच्या कार्यात लीलाताईंचा सहभाग होता.
वं. दादांना कामकाजात आलेली व्यक्ती कशाकरीता आली आहे हे माहित असे. परंतु सौ. लीलाताईंच्या माध्यमातून त्या व्यक्तीच्या सातपिढ्यांचे दोष काढताना वं. दादा आलेल्या व्यक्तिला त्यांच्या घराण्यातील माहिती बरोबर आहे की नाही हे पडताळून पाहात.
वं. दादा सौ. लीलाताईंच्या डोक्यावर हात ठेवून समोर बसलेल्या व्यक्तिच्या डोळ्यात त्यांना बघावयास सांगत. एका क्षणात त्यांच्या सात पिढीतील इच्छा वासनेने अडकलेले आत्मे त्यांच्या घराण्यातील माहिती देत व सद्गतीस जात. त्यावेळी वं. दादा सौ. लीलाताईंचे डोके हाताने मध्ये ठेवलेल्या नारळावर टेकवीत. इ. स.1953 ते 1955 पर्यंत वं. दादा या पध्दतीने कामकाज करीत होते. कामकाजाला वं. दादा आसन घेऊन मध्ये बसत. व सौ. लीलाताई दादांच्या उजव्या हाताला व त्यांच्यासमोर ज्याचे काम असेल त्या व्यक्तीला बसवीत असत. पुणे आणि भिलवडी येथील वास्तव्यात अशा पध्दतीने अनेक लोकांच्या अडीअडचणीचे निराकरण केले गेले. त्यावेळी भक्तांची गर्दी खूप असल्याने कामकाज दुपारी चार वाजेपर्यंत चालत असे. तोपर्यंत वं. दादा व सौ. लीलाताई यांना काहीही न खाता पिता रहावे लागे. निराकरणासाठी येणा-या प्रत्येकाचे काम तात्काळ होत असे.
१. वं. दादांकडून सौ. लीलाताईंच्या माध्यमातून आवाहन
एकदा वं. दादांनी सौ. लीलाताईंना श्रीनवनाथ पोथीचे पारायण करण्यास सांगितले. ते पूर्ण झाल्यावर सौ. लीलाताईंच्या डोक्यावर हात ठेवून प्रत्येक विभूतींना त्यांच्या माध्यमातून आवाहन केले. असे करण्यामागील कारण वं. दादा परलोकवासी झाल्यावर लक्षात आले. असे विभूतींना आवाहन करून संचारावस्थेनंतर सौ. लीलाताईंना त्याचा शारीरिक त्रास सहन करावा लागत असे. भिलवडीहून वं. दादा, सौ. लीलाताई व सर्व कुटुंबीय पुण्यास रविवार पेठेत रहावयास आले. तेथे रोज सकाळी पूजा पूजा, साधना करून वं. दादा कामकाज करण्यासाठी आसनावर बसत.
२. स्पर्शसंवेदना प्राप्ती
वं. दादांच्या आज्ञेनुसार सौ. लीलाताई भिलवडीला राहात होत्या. तेव्हा वं. दादा अधूनमधून तेथे येत असत. एके दिवशी वं. दादा तेथे आले असताना सौ. लीलाताई बसल्याजागी अचानक जमिनीपासून एक फूट वर उडू लागल्या. हे वं. दादांनी पाहिले. वं. दादांच्या माध्यमात प. पू. हाजीमलंगबाबांचा संचार झाला. त्यांनी सौ. लीलाताईंच्या डोक्यावर हात ठेवला तेव्हा दोन्ही हात एकदम वरखाली होऊ लागले. अर्ध्या तासानंतर हे सर्व थांबल्यावर प. पू. हाजीमलंगबाबांनी मामांना ऋग्वेदातील ऋचांचा संदर्भ सांगून त्यातील ऋचा ‘संथा’ पध्दतीने शिकविण्यास सांगितले. पूर्वी ऋषींनी या सिध्द केलेल्या आहेत व ते अशा संवेदना देऊन शारीरिक व्याधी दूर करीत असत. त्या सिध्दतेचा वं. दादांनी आपल्या कार्यात उपयोग करून घेतला. त्यांनी या सिध्दतेला ‘स्पर्शसंवेदना‘ हे नाव दिले. तेव्हा मामांनी लंडन येथील ‘स्पिरिच्युअल संस्थेत’ या सिध्दतेला स्पिरिच्युअल हिलींग असे म्हणतात व तेथे अशा प्रकारचे कार्य चालू आहे असे सांगितले.
३. विभूतींचे चक्षुःवर्णन
भिलवडीत प. पू. हाजीमलंगबाबा, बगदादचे प. पू. महंमद जिलानी बाबा, गुलबर्ग्याचे ख्वाजाबंदेनवाब इ. पुण्य विभूती वं. दादांच्या माध्यमात येऊन मामांना सांगत की आम्ही ज्या कार्यासाठी आलो आहोत त्याची योग्य वेळ येताच आम्ही पुनश्च आगमन करू. मामांच्या सांगण्यावरून विभूतींचे दादांच्या माध्यमातून सौ. लीलाताईंना साक्षात दर्शन घडले. डोळे मिटल्यावर पुण्य विभूती जशा प्रत्यक्षात आहेत तसे दर्शन त्यावेळी सौ. लीलाताईंना वं. दादांच्या माध्यमात झाले. वं. दादा बसले असताना सुध्दा प. पू. हाजीमलंगबाबा फार उंच धिप्पाड, गोरे पान, सफेद लांब दाढी, गळ्यात स्फटीकांच्या माळा व लुंगी अशा वेशात दिसले. त्यांच्या डोळ्यातून प्रेम ओसंडत होते. प. पू. महंमद जिलानीबाबा वयोवृध्द, देखणे, करारी नजर, सफेद दाढी, हातात एक वेताची छोटीशी छडी, लुंगी, अंगावर शालीसारखे वस्त्र असे दिसत होते. असे वर्णन लीलाताईकडून ऐकल्यावर सर्वांनाच आनंदाश्रू दाटून आले.
काही सिध्द साधनेसाठी सौ. लीलाताई भिलवडीला रहात असताना, मामांची मुले प्लॅन्चेट करीत; तो त्यांना खेळ वाटत असे. परंतु वं. दादांना पुण्याला याची जाणीव झाली ते तडक भिलवडीला आले. प. पू. हाजीमलंग बाबांचा संचार झाला व त्यांनी असे पुन्हा करू नका असे सांगितले कारण प्लॅन्चेट वर विभूती कधीच येत नाहीत कारण त्या सप्तलोकात असतात. उलट पृथ्वीलगत असलेले अर्थ बाऊंड म्हणजे इच्छा वासनेने जे आत्मे फिरत असतात तेच विभूतींचे नाव घेऊन येतात. व आपली दिशाभूल करतात. प्लॅन्चेट करणा-यांना त्याची बाधा होते व ती बाधा काढणे अत्यंत अवघड असते.
४. मच्छिंद्र गडावर प. पू. साईबाबांचे दर्शन
प.पू. हाजीमलंग बाबांच्या आज्ञेवरून मच्छिंद्रगडला जाण्यास आज्ञा झाली असता घरातील लहान मुले, मुली, सौ. लीलाताई असे सर्वजण गेले असता गड चढताना वाट चुकले. रस्ता विचारण्यास कोणी भेटले नाही तेव्हा एका झाडाखाली एक कांबळे अंथरून हातात काठी, डोक्याला फडके, थोडी दाढी असलेल्या एका वृध्द गृहस्थाने ‘पोरी कुठे निघालीस, ह्या वाटेने नग जाऊस ह्यो रस्ता मच्छिंद्रगडला जातो या वाटेने जा‘ असे सांगितले. घरी परत आल्यानंतर वं. दादांनी विचारले की साईबाबांना नमस्कार केला नाही का? तुम्हाला त्यांनी रस्ता दाखविला. हे ऐकल्यावर सौ. लीलाताईंना प. पू. साईबाबांच्या प्रत्यक्षदर्शनाने कृतार्थ वाटले.
५. औदुंबर येथील पादुका दर्शन
वं दादांच्या बरोबर कामकाज करीत असताना कामकाजाला आलेल्या लोकांच्या सात पिढ्यातील आत्मे सौ. लीलाताईंना सारखे त्रास देत असत. तो त्रास कमी व्हावा म्हणून वं. दादा त्यांना अधून मधून औदुंबरला घेऊन जात असत. त्यावेळी तेथे फक्त दगडी पादुकाच होत्या. त्या पादुकांना स्नान घालण्याकरीता ओलेत्याने ते करण्याचा अधिकार तेथील पुजारी व्यक्तींना होता. सौ. लीलाताईंना आठ तास नारळावर डोके ठेऊन आत्म्यांना मुक्तता देण्याचे काम करावे लागत असे त्यामुळे झोप, जेवणखाण होत नसे. अतिशय यातना सहन कराव्या लागत होत्या म्हणून वं. दादा त्यांना घेऊन औदुंबर येथे गेले. त्याकाळी स्त्रियांना दर्शनासाठी आत पादुकांपर्यंत जाऊ देत नसत. आणि त्यांचा त्रास कमी होण्यासाठी पादुकांवर डोके ठेवणे आवश्यक होते. तेथील गुरूजींनी दरवाजास कुलुप लावले. एकदम वं. दादांच्यात गोरखनाथांचा संचार झाला. त्यांनी सौ. लीलाताईंचे डोके पकडून पुढे ओढले व दरवाजाचे कुलूप चटकन खाली पडले. वं. दादांनी त्यांना मंदिरात नेऊन त्यांचे डोके पादुकांवर आपटले. त्यानंतर मात्र सौ. लीलाताईंना होणारा बाधेचा त्रास कमी झाला.
वं. दादा सर्व भक्तांसह एकदा शिर्डीस गेले असताना तेथील लेंडी बागेजवळील मोकळ्या मैदानावर ते सर्वांना घेऊन गेले व बाबा येथून जाताना दिसतील असे सांगितले. बाबा जात असतांना फक्त वं. दादा व सौ. लीलाताई यांना दिसले. वं. दादांबरोबर त्यांनी तो दिव्य अनुभव घेतला.
1955 पासून वं. दादांनी सेवक तयार केले. आणि त्याच दरम्यान लीलाताई यांचा विवाह श्री नाना भट्टे यांच्याशी झाला. कामकाजानिमित्ताने वं. दादा त्यांच्या मुंबईच्या मुक्कामात सौ. लीलाताईंच्या घरी माहीम येथे मुलाखत घेत असत. आणि जरूर पडल्यास सौ. लीलाताईंना कामकाजासाठी म्हणून आपल्याबरोबर घेऊन जात असत.