वं. दादांची कार्यसिध्दता :
१. वं. दादांची कार्यसिद्धता
वं. दादांच्या घरण्यात दत्तपरंपरा व हनुमानाची उपासना होतीच तसेच घरात देवधर्म साधन यात कधीच खंड नव्हता. साता-यात कोणीही सत्पुरूष आले की वं. दादांचे वडील त्यांची विचारपूस करीत. अण्णा नियमितपणे श्रीनवनाथ पोथीची पारायणे करीत असत. वं. दादांची बहिण लीला याही वयाच्या तेराव्या वर्षापासून नवनाथ पोथीची पारायणे करीत.
वं. दादांच्या जीवनचरित्रात सांगितल्यानुसार वं. दादांना लहानपणी वयाच्या आठव्या वर्षीच तेली महाराजांचा व भैरवनाथांचा आशीर्वाद मिळाला. त्यांच्याकडून मिळालेला अन्नब्रह्माचा आशीर्वाद वं. दादांनी केंद्रावर येणा-या भक्तभाविकांपर्यंत पोहोचविला. व भक्तांना खाण्यापिण्याला कधीच कमी पडले नाही.
प. पू. बाबांनी एके दिवशी वं. दादांना विचारले ‘तुला काय पाहिजे?’ तेव्हा वं. दादांनी ‘‘जीवनामध्ये सर्वसामान्य माणसाला जी दुःखे आहेत त्याचे निवारण होण्याचे साधन मला द्या.’’ असे सांगितले. वं. दादा नियमितपणे जोगेश्वरी देवी व दगडू हलवायांचा दत्त यांचे दर्शन घेत. त्यांना ऑफीसमध्ये शारिरीक त्रास होत असे. हळू हळू वं. दादांचा शारिरीक त्रास वाढू लागला. काही दिवसात त्यांचा परकायाप्रवेश सुरू झाला. एकदा तर एकविस दिवस ते घरातच एका खांबापाशी अन्नपाण्याशिवाय बसून होते. या दिवसात त्यांना शेष देवतेचा संचार झाला. सगळीकडे सुवास पसरला. ‘तुमच्या व जगाच्या कल्याणासाठी आम्ही आलेलो आहोत’ असे त्यांनी घरातील सर्व मंडळींना सांगितले. काही दिवस वं. दादांना समोर येणाया भक्ताच्या अडीअडचणी पत्रिका सर्व समजत असूनही कोणाच्याही प्रश्नाचे उत्तर द्यावयाची आज्ञा नव्हती. नंतर आज्ञा झाल्यावर वं. दादा लोकांचे प्रश्न, पत्रिका इ. बद्दल माहिती सांगू लागले. येणा-या भक्तांच्या प्रापंचिक अडचणींचे निराकरण वं- दादांकडून केले जाऊ लागले. त्या निराकरणामध्ये सद्गुरू वं. दादांनी सिद्ध केलेले एक साधन किंवा सिध्दी म्हणजे ‘ताम्हन लावणे’. प्रारंभीच्या काळातच वं. दादांनी ही सिध्दी प्राप्त केली असल्याने बाधीत भक्ताची त्याला झालेली बाधा ताम्हनात विसर्जन होऊ लागल्याने भक्तांची कामे लवकर होऊ लागली. वं. दादांकडे आपल्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी सिनेमा सृष्टीतील लोकही येत. उदाहरणादाखल भगवान पालव, बेबी शकुंतला, व्हि. शांताराम यांच्या राजकमल स्टुडिओतील श्री. पेशकर, सी. रामचंद्र, दामुअण्णा मालवणकर इ. ची नावे सांगता येतील.
श्री भगवान पालव यांचे चित्रपट चांगले चालत नसल्यामुळे ते कर्जबाजारी झाले होते. त्यावेळी वं. दादांनी त्यांच्या मुंबईतील स्टुडिओत जाऊन त्यांचे काम केले. पुढे त्यांचा ‘अलबेला’ चित्रपट खूपच लोकप्रिय झाला. व ते कर्जमुक्त झाले. या कामकाजाच्या वेळी वं. दादा श्री भगवान यांच्या स्टुडिओत गेले असता तेथे काम करणारा गुजराथी नोकर प. पू. बाबांचा फोटो पाहून खाली पडला व ओरडू लागला. तो गुजराथी भाषेत काय बोलतो ते कळत नसल्याने गुजराथी माणसाकडून अर्थ समजून घेतला. त्यानुसार त्या मुलाच्या अंगात देवीचा संचार झाला होता. देवीने सांगितले ‘‘याच्या आईवडिलांनी याला मला वाहिला होता. आपल्या गावात राहून लोकांना अडीअडचणीला मार्गदर्शन करायचे सोडून हा येथे मुंबईला आला आहे. ज्या गोष्टींचे पालन करायला हवे ते तो करीत नाही म्हणून मी त्याची वाचा बंद केली. पूर्वी हा बोलत असे. प. पू. बाबांचा फोटो पाहून मी पुन्हा याच्या देहात संचार केला. याने गावाला जाऊन तेथील लोकांचे काम करावे यातच त्याचे कल्याण आहे.’’ आणि देवीचा संचार बंद झाला. त्यानंतर त्या संचाराचे पालन होऊ शकणार नाही हे लक्षात घेऊन ‘बहुचराईत’ देवीने त्याला मुंबईला जाऊन वं. दादांना भेटावयास सांगितले. वं. दादांनी त्या नोकराची देवीच्या संचार अवस्थेपासून सोडवणूक केली व देवीच्या आज्ञेनुसार कार्यार्थ ‘बहुचराई’ देवीचा आशीर्वाद घेतला. पुढे एके दिवशी वं. दादांना द्दष्टांन्त होऊन पुण्यातील ‘बहुचराई’ देवीचे देऊळ दिसले. रविवारात राहण्याच्या ठिकाणापासून जवळच असलेल्या या देवळात वं. दादा नित्य दर्शनाला जाऊ लागले. देवीच्या आज्ञेनुसार नित्याच्या पूजनात वं. दादांनी देवीचा टाक करुन त्याची स्थापना केली आणि या देवतेचा कार्यात समावेश करून घेतला.
यानंतर वं. दादांनी 1952 साली श्री क्षेत्र औदुंबर येथे जाऊन साधना केली. परलोकाचा अभ्यास केला. त्यासाठी त्यांना मध्यस्थाची आवश्यकता होती वं. दादांनी ती जबाबदारी त्यांच्या भगिनी लीलाताई यांच्यावर सोपविली व त्यांच्या माध्यमाच्या साह्याने कार्य करण्याचे ठरविले. त्यावेळी ‘परलोकाचे झालेले दर्शन’ या प्रसंगाचे वर्णन वं. दादांनी ‘आत्मनिवेदन’ मध्ये केले आहे. या काळात वं. दादांबरोबर त्यांच्या भगिनी लीलाताई यांचा कार्यार्थ सहभाग फार मोठा आहे.
२. वंशविमोचन
वं. दादांना प. पू. बाबांची आज्ञा झाली. की ‘‘जी दुःखी माणसे आपल्याकडे कामकाजासाठी येतील त्यांच्या घराण्यातील जे आत्मे मुक्त झालेले नाहीत त्यांचा संबंध पुढील पिढ्यांच्या जीवनाशी ऋणानुबंधपरत्वे काय आहे हे आपल्याला कळले पाहिजे त्यासाठी ‘वंशविमोचन’ हा विधी संकल्प सिद्ध करणे आवश्यक आहे.’’ त्यानुसार पहिले वंशविमोचन कल्याणच्या हाजीमलंग बाबांच्या पहाडावर संक्रांतीला झाले. त्यासाठी नियमित, निष्ठेने येणा-या भक्तांना, त्यांच्या कुटुंबातील सात पिढ्यातील पितरांना मुक्त करण्यासाठी एक सुपारी पूजनासाठी दिली. त्याचे अकरा आठवडे पूजन करण्यास सांगितले. ते चालू असेपर्यंत परान्न, मांसाहार वर्ज्य होता. संक्रांतीला प. पू. हाजीमलंग बाबांच्या पहाडावर वंशविमोचनाचे पहिले हवन शंकराच्या पिंडीसमोर असलेल्या मैदानात करण्यात आले. साधन-सिद्धतेची पूर्तता होईपर्यंत वं. दादा व त्यांच्या भगिनी लीलाताईंना शारीरिक व मानसिक खूप त्रास सोसावा लागला. 1956 ते 1960 पर्यंतच्या प्रत्येक संक्रांतीला हाजीमलंग पहाडावर पाच हवने व वंशाविमोचनाची कठोर साधना सिद्ध केली.
३. प्रतिमासिद्धतेची पूर्वतयारी
आपण आवाहन केल्यानंतर देवदेवतांची शक्ती व्यक्तीमध्ये धारण होते की नाही हे पडताळून पाहण्यासाठी त्यावेळी अनेक वर्षे मुंबई, पुणे येथे नियमितपणे येणा-या भक्तांमध्ये वं. दादांनी संचार अवस्था देऊन पाहिली. त्यामध्ये वं. दादांचे कनिष्ठ बंधू राम व लक्ष्मण यांच्यात भागवतांची कुलस्वामीनी श्रीमहालक्ष्मी व कुलस्वामी खंडोबा यांचा संचार करविला. हा संचार देत असताना वं. दादांना श्रीगोरखनाथांचा संचार होत असे. तो इतका प्रखर असे की त्यापूर्वी अर्धातास नळाखाली डोक्यावरून गार पाण्याचे स्नान करून ओलेत्यांनी सर्वांच्या डोक्यांवर हात ठेवून त्या शक्तीला आवाहन करवित. वं. दादांनी ही शक्ती प्रतिमेमध्ये अंतर्भूत करावयाची असल्यामुळे मध्यस्थ नसलेल्यांमध्ये सुद्धा त्यांनी शक्तीस आवाहन केले. ती सिद्धता पूर्ण झाल्यावर दैवी शक्ती बोलावण्याचे थांबविले. प्रतिमा सिद्ध करण्यापूर्वी वं. दादांनी त्यांचे धाकटे बंधू लक्ष्मण यांच्या माध्यमात खंडोबा व देवी यांचा संचार करवून या दैवतांची मान्यता घेतली.
राहत्या जागेच्या प्रश्नासाठी वं. दादांच्या मामांनी प. पू. हाजीमलंग बाबांना जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा आमचे पूर्ण लक्ष दादांच्या कुटुंबावर आहे. सबूरीने घ्या. आणि लीलाताईंच्या डोक्यावर हात ठेवला आणि डोळे मिटून काय दिसते बघ असे सांगितले तेव्हा लीलाताईंना ‘प्रभातरोड’ ही अक्षरे दिसली, मोठा बंगला दिसला व तेथे देव्हा-यातील प. पू. साईनाथ महाराजांचा फोटो दिसला. त्याशिवाय अनेक भक्तभाविक, तीर्थप्रसाद घेऊन जाताना दिसले. त्यावेळी हे कसे शक्य आहे असे सर्वांना वाटले. त्यावर वं. दादा म्हणाले, ‘एक वेळ ब्रह्म खोटे ठरेल पण प. पू. विभूतींचा शब्द खाली पडणार नाही.‘ प. पू. बाबांच्या आशीर्वादाची प्रचिती येऊन 1962 च्या वर्षात ‘द्वारकामाई’ वास्तू पूर्णत्वाला येऊन वं. दादांचे तेथे वास्तव्य सुरु झाले.
४. अजमेरचा आशिर्वाद
वं. दादांना ‘द्वारकामाई’ या वास्तुसाठी अजमेरच्या ख्वाजा गरीब नवाज यांचा आशिर्वाद प्राप्त झाला असला तरी वं. दादा अजमेर येथे गेले नव्हते. ‘द्वारकामाई’ पूर्ण झाल्यावर वं. दादा काही भक्त व कुटुंबातील राम, लक्ष्मण हे बंधू व लीलाताई यांना बरोबर घेऊन अजमेर येथे गेले. तेथे गेल्यावर सर्वांतर्फे समाधीवर चादर चढवल्यावर तेथील वयस्कर मुजावरांनी सर्वांना बसण्यास सांगून वं. दादांच्या डोक्यावर टोपी घातली. वं. दादांची पूजा केली व म्हणाले ‘काल माझ्या स्वप्नात बाबा आले व त्यांनी पांढरा झब्बा व पायजमा घातलेली व्यक्ती माझ्या दर्शनाला येईल ती व्यक्ती तुझा प्रश्न सोडवेल. ही संधी तू वाया घालवू नकोस असे सांगितले आहे म्हणून मी तुम्ही येण्याची वाट बघत होतो. माझ्या सहा मुलींची लग्ने बरेच प्रयत्न करून व माझी येथील पन्नास वर्षांची सेवा असूनही होत नाही.’ वं. दादांनी त्यांना योग्य ते निराकरण सांगितले आणि त्यामुळे त्यांच्या वंशाचे दोषांचे निराकरण झाले. पुढील वर्षी जेव्हा वं. दादा अजमेरला गेले तेव्हा त्या मुजावरांच्या सर्व मुलींची लग्न झाली होती.
५. आरतीसाधनेची सिद्धता
वं. दादा जेव्हा अजमेरला ख्वाजा गरीबनवाज यांच्या दर्शनार्थ गेले होते त्यावेळी त्यांना ‘श्रीपंतमहाराज बाळेकुंद्रीकर’ यांना भेटण्याची आज्ञा झाली. त्यांचा या कार्यात महत्वाचा भाग आहे. तेथे तुला त्यांची जी आज्ञा होईल त्याप्रमाणे कर असे सांगितले. त्यानंतर लगेचच वं. दादा मुंबईत ‘हेमकुंज’ येथील केंद्रावर गेले असता दादाजी धागजी कंपनीचे मालक व पंतभक्त श्री मुकुंद रावराणे यांची वं. दादांची भेट झाली. ते वं. दादांना बाळेकुंद्रीला घेऊन गेले. तेथे आज्ञेप्रमाणे सात दिवस श्री नवनाथ पारायण केले. श्रीनवनाथ पोथीचे व ‘श्रीदत्तप्रेमलहरी’ या श्रीपंतमहाराजाच्या पदांच्या ग्रंथाचे मनोभावे पूजन करून पारायणाची सांगता केली. श्रीपंतमहाराजांनी ‘श्रीदत्तप्रेमलहरी’ या पुस्तकातील वं. दादांना योग्य वाटतील अशा पदांना चाली लावण्याची आज्ञा केली. त्यानुसार वं. दादांनी योग्य वाटलेल्या पदांना चाली लावल्या व त्या पदांचे वेगवेगळे सेट करून कार्य केंद्रावरील रोजच्या आरतीत त्यांचा समावेश केला. कारण भक्तांनी पदे म्हणताना व ऐकताना त्यांचे अष्टसात्विक भाव जागृत होऊन ‘मन’ या अवस्थेची जाणीव व्हावी हा त्यामागे हेतू होता. भक्तांनी आरतीला नियमित येण्याने त्यांचे कर्मविमोचन व्हावे अशी तरतूद वं. दादांनी केली म्हणून ‘आरती’ सुद्धा एक साधनाच आहे.
६. वं. दादांनी प्राप्त केलेली सिध्दी चमत्काराच्या स्वरूपात
एके दिवशी वं. दादांच्या हातावर एका भक्तांने काम झाले म्हणून बर्फीचा एक तुकडा ठेवला. वं. दादा त्यावेळी कोणाकडेच काहीही खात नसत. त्यांनी जमलेल्या प्रत्येक भक्ताला हातावरचा प्रसाद घेण्यास सांगितले. प्रत्येक भक्ताने एका वडीचा प्रसाद घेतला की हातावर दुसरा बर्फीचा तुकडा तयार असायचा. अशा तहेने सर्वांना प्रसाद मिळाला. एका उरुसाला प. पू. बाबांच्या फोटोतून रेवड्या व गुलाबाची फुले प्रसाद म्हणून बाहेर आली. एकदा मुलाखत चालू असताना अर्धा कप चहा वैद्य बाईंनी वं. दादांना पिण्यास दिला. वं. दादांनी दोन घोट घेऊन तो कप शेजारी बसलेल्या भक्ताला दिला व नंतर तो कप तसाच प्रसाद म्हणून तेथे बसलेल्या प्रत्येक भक्ताला देण्यास सांगितले. प्रत्येक भक्ताने त्यातील चहा घेतल्यानंतर सुध्दा कपात चहा शिल्लक राहीला. एक भक्त नेहमी कॉफी घेत, चहा कधीच घेत नसत. त्यांनी त्या प्रसादाचे सेवन केले तेव्हा कॉफी घेतल्यासारखे वाटले. कार्यानिमित्त वं. दादा पुण्यात असत व सौ. लिलाताई सातारा येथे असत. सौ. लीलाताईंना बाधांचा त्रास होत असे तेव्हा वं. दादांनी सौ. लीलाताईंना सांगितले की, मी रोज संध्याकाळी सात वाजता येईन व बाधांचा त्रास कमी होईल. रोज संध्याकाळी सात वाजता लोबान न घालतासुध्दा सर्व बंगल्यात लोबान व धूप यांचा वास येत असे. नंतर गुलाब व उदबत्तीचा वास येत असे. अशा तहेचे अनेक चमत्कार वं. दादांनी दाखविले. परंतु हे आपल्या उपयोगाचे नाही, तर ‘गुरुमार्गात भवितव्यात जगाला ज्याची जरुर आहे अशी अवस्था प्राप्त करून घ्यावयाची आहे’ असे वं. दादांनी सांगितले.