'श्री साईलीला' संकेत स्थळाचा उद्देश:
गुरु माझा धर्म, गुरु माझे कर्म।
गुरुदेव परम अन्य नास्ति॥
असा गुरुकृपेचा महिमा या व पंतमहाराजांच्या पदांतून ठायी ठायी व्यक्त होतो. जो आरतीतून आपल्याला अनुभवता येतो. अशा गुरुकृपेचे वलय असले म्हणजे आदिभौतिक व आदिदैविक असा सर्वांगिण विकासाचा मार्ग सहज सुकर होतो. याचा प्रत्यय आपण सर्व भक्तभाविकांना श्रीसद्गुरुनाथ दादांच्या कृपाशिर्वादाने येतच आहे.
आमच्यासारखे अनेक भक्तभाविक गेली 20-25 वर्षे या उपासना मार्गात आहेत. हे कार्य सिद्ध होण्यासाठी श्रीसद्गुरुनाथ दादांनी वंशविमोचन, कर्मविमोचन, ऋणविमोचन यासारख्या कठीण निराकरणांसाठी खडतर साधना केली. त्यासाठी प्रारंभीच्या काळात आर्थिक, शारीरिक त्रास सोसला. या सर्व कठीण, खडतर साधना करीत असण्याच्या काळात त्यांच्या कुटुंबियांचे त्यासाठी असणारे योगदान ही तितकेच मोलाचे होते. श्रीसद्गुरुनाथ दादा असतांना त्यांचे श्रेष्ठत्व, त्यांचे कार्य, याविषयी असणारा भीतीयुक्त आदर यामुळे त्यांच्याशी या कार्याविषयी बोलण्यास मन धजावत नसे. परंतु श्रीसद्गुरुनाथ दादांची थोरवी आमच्यासारख्यांना अधिक समजत गेली ती. वं. दीपकदादा व सौ. लीलाताई भट्टे (श्रीसद्गुरुनाथ दादांच्या भगिनी) यांच्याकडूनच.
आमच्या सद्भाग्याने वं. दीपकदादा व सौ. लीलाताई यांचा सहवास आम्हाला लाभला. सौ. लीलाताई या वं. दादांच्याबरोबर प्रत्यक्ष कार्यात अगदी सुरुवातीपासून असल्याने कोणत्याही निराकरण किंवा कार्याच्या संदर्भातील अगदी जुन्या आठवणी बोलण्याच्या ओघात त्या सहजपणे सांगत असत. त्या आठवणी आमच्यापर्यंत फक्त मर्यादित न राहता, इतर अनेकांपर्यंत पोहोचाव्यात असे वाटले. त्यामुळे या सर्व आठवणी लिखित स्वरूपात उपलब्ध झाल्या तर आमच्याबरोबर अनेक भक्त व पुढील पिढीलाही मार्गदर्शक ठरतील व हे कार्य जास्त जोमाने वृद्धिंगत होईल या हेतूने आम्ही भक्तांनी सौ. लीलाताईंना या आठवणी लिहून काढण्यासाठी विनंती केली. या आठवणींमधून श्रीसद्गुरुनाथ दादांच्या कार्यात सुरुवातीच्या काळात सौ. लीलाताईंचा असणारा सहभाग व श्रीसद्गुरुनाथ दादांच्या देहत्यागानंतर पुनश्च सौ. लीलाताईंचा कार्यात असणारा सहभाग यांचा अनुबंध सहज लक्षात येतो.
सौ. लीलाताईंच्या माध्यमातून अनेकांनी मार्गदर्शन घेतले. अनेकांचे प्रश्न निवारण झाले. अनेकांचे आयुष्य उभे राहिले. शुभदिन सोहळा, शक्तीपीठ तपःपूर्ती सोहळा, पादुका पूजन यासारखे मोठे सोहळे झाले. रत्नागिरी, नाशिक, दिल्ली, सातारा, डोंबिवली व जयपूर या नवीन केंद्रांची स्थापना झाली. परदेशात श्रीसद्गुरुनाथ दादांच्या पादुकांची स्थापना व कार्याचा प्रसार झाला. येथील कार्यरत असलेल्या केंद्राबरोबरच दुस-या राज्यात व परेदशातही संमेलने झाली. या सर्वच कार्यांमागे सौ. लीलाताईंचे मार्गदर्शन हीच प्रेरणा होती.
श्रीसद्गुरुनाथ दादांच्या या कार्यात त्यांच्या कुटुंबियांचा असणारा सहभाग, त्यांचे मौलिक योगदान व वं. दादांच्या देहत्यागानंतरही तितक्याच जोमाने चालू राहणारे कार्य, यांचा कार्यकारण भाव समजावा म्हणून सौ. लीलाताईंनी या आठवणींना शब्दरुप दिले व आपल्यासमोर पुस्तकरूपाने उपलब्ध करुन दिले. याबद्दल आपण सर्व भक्तभाविक त्यांचे जन्मोजन्मी ऋणी राहू.
या संकेत स्थळाच्या रूपाने शब्दांकित झालेल्या या आठवणी, ही माहिती, गुरुमार्गाच्या वाटचालीचे केलेले अवलोकन हे आपण सर्व भक्तभाविकांना व पुढील पिढीलाही ‘दीपस्तंभा‘ सारखे मार्गदर्शक ठरावे अशी श्रीजगद्गुरु साईनाथ महाराज, श्रीसद्गुरुनाथ दादा व पुण्य विभूती यांचे चरणी प्रार्थना.
-भक्त-भाविक