वं. दादांच्या कार्याचा विस्तार :
वं. दादांच्या कार्याचा विस्तार
भिलवडी, 486, रविवार पेठ, पुणे व 331 शनिवार पेठ, पुणे या ठिकाणी केलेल्या कामकाजाच्या अनुभवातून सर्व सामान्यांच्या वाट्याला किती प्रकारचे दुःख असू शकते व त्याचे कारण काय असू शकेल याचा अभ्यास केला गेला. त्यानंतर प. पू. महंमद जिलानी बाबांनी तेरा प्रसादांचे निराकरण कार्यान्वीत केले. पुढे कामकाजाला येणाया प्रत्येक माणसाने या तेरा प्रसादांचे निराकरण मनोभावे पूर्ण केल्यानंतर त्याला जीवनात कुठल्याही प्रकारची अडीअडचण वा दुःख शिल्लक राहत नसे. अशा प्रकारे वं. दादांनी हजारो कुटुंबियांचे कामकाज केले. त्यापैकी थोडेच कुटुंबीय आजपर्यंत केंद्रावर येऊन कार्याचा लाभ घेत आहेत. ज्यांचा जेवढा ऋणानुबंध होता तो पुरा करून ते निघून गेले. येणाया भक्तांच्या मुलांना वं. दादा शिक्षणाकरीता फी देत असत. ज्यांचा जागेचा प्रश्न होता त्या विद्यार्थ्यांना घरी ठेवून घेत.
१. ‘हेमकुंज‘ दादर, मुंबईतील कामकाजास सुरूवात

एकदा गंपूदादा व बंडूदादा तांबे असे दोन भाऊ कामकाजाला आले. एकाला ‘प्रमोशन‘ मिळत नव्हते व एकाचा व्यवसाय नीट चालत नव्हता. त्या दोघा भावांच्या कामकाजासाठी वं. सौ. लीलाताई व वं. दादा त्यांच्या घरी गेले. वं. दादांना व सौ. लीलाताईंच्या माध्यमातून बंडूदादांचे काम केले. अमेरिकेत ते जेथे गेले होते तेथील बाधा वं. सौ. लीलाताईंच्या डोक्यावर हात ठेवून बोलावली आणि वं. सौ. लीलाताईंना इंग्रजी येत नसतानासुध्दा त्यांनी अमेरिकेतल्या वास्तव्यातील सर्व माहिती इंग्रजीमधून सांगितली. त्यांना आश्चर्य वाटले, विश्वास बसला व त्यांचे प्रमोशनचे काम झाले.
त्यावेळी फक्त श्री. दासगणु यांनी लिहिलेल्या श्रीसाईबाबांच्या आरत्या म्हटल्या जात. पुण्याला गुरुपौर्णिमा, विजयादशमी, दिवाळीतील लक्ष्मीपूजन, दत्तजयंती, हाजीमलंग बाबांचा ऊरुस, चैत्र पाडवा, रामनवमी, हनुमान जयंती इ. सण उत्सव म्हणून साजरे होत असत. त्यावेळी मुंबईचे बरेच भक्त भाविक पुण्याला उत्सवासाठी येत असत. बाहेरचे कुठलेही पदार्थ चालत नसत. आलेल्या सर्व मंडळींचा स्वयंपाक घरातील बायका करीत असत. गायक, वादक यांची कामे झाल्यामुळे ते सुध्दा नवरात्रात बाबांच्यासमोर आपली हजेरी लावत. सनईवादक खळदकर असेच कामकाजाला आल्यानंतर दरवर्षी नवरात्रात व उत्सवाच्या दिवशी सकाळी व संध्याकाळी आरतीपूर्वी सनई वाजवित. वं. दादा, अण्णांच्या पश्चात ती. आई, ति. काकी, रमाबाई तांबे, गिजरे यांना घेऊन काशीला गेले. तेथून गयेला जाऊन त्यांनी स्वतःच्या घराण्याचा वंशविमोचन विधी केला. कारण वं. दादांच्या घराण्यात जरी वंशदोष नसला तरी चुलत घराण्यांतला दोष राहू नये म्हणून विधी करावा लागला. एक दिवस गयेला रात्री बारा वाजता वं. दादांच्या खोलीचा दरवाजा ठोठावल्याचा भास झाला. दरवाजा उघडल्यावर अनेक आत्मे ‘मुक्ती द्या‘ असे सांगत होते. ते आत्मे म्हणाले ‘‘आम्ही मुक्त व्हावे म्हणून गयेला आमच्या पिढीतील अनेक लोक श्राध्दविधी करण्यासाठी येतात. परंतु आम्ही मुक्त होण्यासाठी आवश्यक ते निराकरण केले जात नाही.‘‘ श्राध्दविधी करणा.यांचे लक्ष फक्त पैशाकडे असते. तेव्हा वं. दादांनी, ‘‘मी जेव्हा वंशविमोचन विधी करीन तेव्हा तुम्ही तेथे या. तोपर्यंत तुम्हाला थांबावे लागेल.‘‘ असे त्यांना सांगितले. वं. दादा काशी प्रयाग करून परत पुण्याला आले. नंतर गंगापूजन केले. त्यावेळी मुंबईचे बरेच भक्त भाविक प्रसाद ग्रहण करण्यास आले होते.
२. श्री साई आध्यात्मिक समितीची स्थापना
इतके वर्ष चालू असलेले हेच कार्य पुढे शनिवार पेठेत 1956 साली विजयादशमीला ‘‘श्री साई आध्यात्मिक समिती” या नावाने सुरू झाले. त्यावेळी वं. दादांच्या माध्यमात गुलबर्गा येथील प. पू. ख्वाजाबंदे नवाज यांनी ‘‘कलम खोलना आसान है मगर निभाना बहुत मुश्किल है’’ असे सांगितले. त्यावेळी मुंबईचे कसबेकर, नाईक मंडळी, कुलकर्णी, देशपांडे, भट्टे बंधू, पुण्यातील भक्तभाविक व घरातील सर्वजण उपस्थित होते. वं. दादांनी एक मोठा लाकडी देव्हारा करून त्याला चांदीचा पत्रा बसविला. मध्यभागी साईबाबांचा फोटो ठेवला. बहुचराई देवीचा छोटा फोटो, खंडोबाचा टाक, कोल्हापुरच्या अंबाबाईची मूर्ती, मारुतीची छोटी तांब्याची मूर्ती इ. देवतांचा देव्हा-यात समावेश केला. साईबाबांच्या फोटोच्या वरच्या बाजूला मध्यभागी हाजीमलंग बाबांचा फोटो लावण्यात आला. या देव्हा-याच्या दोन्ही बाजूस एका बाजूला साईबाबांची गादी व दुसया बाजूला हाजीमलंग बाबांची गादी अशी रचना केली. त्यावेळी वं. दादा वरचेवर अनुष्ठान मांडून नऊ जणांत श्री नवनाथ पोथीचे अध्याय वाटून पारायण करण्यास सांगत.
त्यावेळी घरीच कार्यकेंद्र असल्यामुळे देवघर दर्शनासाठी सकाळपासून रात्रीपर्यंत उघडे असे. वं. दादा रोज सकाळी गुरुचरित्राच्या पोथीतील एक अध्याय वाचीत असत. एकदा श्रावण महिन्यात बाबांच्या नामःस्मरणाचा सव्वा लाख जप मुंबई व पुणे केंद्रावर करण्याचा संकल्प भक्तांच्याकडून करुन घेतला. तेवीस जुलै 1960 रोजी त्यासंबंधी एक निवेदन काढण्यात आले होते. त्याकरीता दोन्ही केंद्रावर जपासाठी नोंदवही ठेवली होती. त्यात जप करणाया व्यक्तीचे नाव, तारीख, वेळ व जपसंख्या लिहीण्यास सांगितले. मुंबई केंद्र हे सुध्दा घरात असल्यामुळे ज्याला ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी भक्त जप करून जात. भक्त भाविकांना एका जागी मांडी घालून आता करीत असलेली साधना द्यावयाची होती. त्याची पूर्वतयारी वं. दादांनी त्यावेळी करून घेतली असावी. पुढे पाच ऑक्टोबर 1961 रोजी वंदनीय दादांनी स्वतःच्या हस्ताक्षरात एक निवेदन काढून भक्तभाविकांकडून सव्वा कोटी जपाचा संकल्प करून घेतला. या काळात वं. दादा वेळ काढून सातारला जात असत.
एकदा श्री. रमण देसाई सातारला जज्ज म्हणून काम करीत होते. त्यांना बदली हवी होती. पण ते काम होत नव्हते म्हणून ते वं. दादांना भेटले. वं. दादांच्याकडून त्यांचे काम झाले. दिल्लीला त्यांची बदली झाली. त्यांना राहण्यासाठी सरकारी जागा होती. त्यांनी वं. दादांना लोकांच्या कामासाठी आपल्या घरी बोलाविले. त्यानंतर वं. दादांचे दिल्लीला वरचेवर जाणे सुरू झाले. अशा त-हेने दिल्ली येथे कार्याचा शुभारंभ झाला. रमण देसाई यांची बदली झाल्यानंतर तेथे येणारे एक भक्त श्री. विजय वर्मा यांच्या कैलाश कॉलनी येथील निवासस्थानी नियमितपणे केंद्रकार्य सुरु झाले. वं. दादांनी एके दिवशी तबकात दोन पाने, सुपारी, श्रीफळ व सव्वा रु. ठेवण्यास सांगितले. वं. दादा आसनावर बसले व प. पू. महंमद जिलानी बाबांचा संचार झाला. त्यांनी तो विडा व श्रीफळ श्रीसाईबाबांच्या समोर ठेवले व यापुढील कामकाजाचे नियम लिहून घेण्यास सांगितले.
1) कामकाजासाठी येणा-यांनी लोबान, धूप घालण्यापूर्वी येऊन विडा ठेवणे व आपले नाव व पत्ता सेवकाला सांगणे. 2) त्याकरीता सेवकांची नियुक्ती केली. 3) दर शनिवारी संध्याकाळी चार वाजता विद्यार्थ्यांसाठी ज्ञानसंवेदना वर्ग सुरु केला. तो वर्ग वं. सौ. लीलाताई व नलुताई नाईक या दोघींनी घेण्याचे ठरले. ज्ञानसंवेदना वर्गात मुलांच्या डोक्यावर हात ठेवून पाठीच्या कण्यावर संवेदना दिल्या जात. ‘भक्तीमार्ग प्रदीप‘ मधील स्तोत्रे शिकविली जात. संतांच्या चरित्रातील गोष्टी, सामान्य ज्ञान यांची माहिती मुलांना सांगितली जात असे. दोन तीन महिन्यांनी वं. दादा स्वतः संवेदना देत असत. त्यावेळी दीपक मंत्री आणि त्याची भावंडे नुकतीच यायला लागली होती. पुढे प. पू. महंमद जिलानी बाबा मुलाखती घेऊ लागले. संध्याकाळच्या आरतीनंतर भक्तभाविकांना आधी एक तास वेळ आहे का? असे विचारीत. मुलाखत संपल्यानंतर बरोबर एक तास झालेला असे. त्यावेळी दोन खोल्यामधील लाकडी दरवाजा बंद करुन त्याच्यामागील बाजूस खडूनी लिहून त्याचा फळ्यासारखा उपयोग केला जात असे.

वं. दादांना मुंबई केंद्रासाठी एक प. पू. साईबाबांचा मोठा फोटो हवा होता. वं. दादांना एक भक्त आर्टीस्ट श्री. स. कृ. काळे यांच्याकडे घेऊन गेले व त्यांनी तयार केलेला प. पू. साईबाबांचा फोटो ‘हेमकुंज‘ येथे आणण्यात आला. एकदा श्री. काळे यांना एका दत्तभक्ताने श्रीपाद श्रीवल्लभ यांचे पेंटींग करण्यास सांगितले. श्री. काळे रोज सकाळी सोवळे नेसून पेंटींग करीत असत. पुढे पेंटींग पूर्ण झाल्यानंतर ज्या व्यक्तीने ते पेंटींग करण्यास सांगितले होते ती व्यक्ती श्री. काळे यांच्या घरी जाऊन म्हणाली, “स्वामी माझ्या स्वप्नात आले होते व माझी सेवा तुला झेपणार नाही. तू मला घरी आणू नकोस”. मला नेण्यासाठी योग्य व्यक्ती तुझ्याकडे येईल. काही दिवसांनी वं. दादांना श्री काळे यांच्या घरी जाण्याची आज्ञा झाली व स्वामींचा फोटो हेमकुंज येथे आला. वं. दादांनी ज्याला जे शक्य आहे त्याप्रमाणे स्वामींच्या फोटोपुढील तबकात फूल ना फूलाची पाकळी म्हणून योग्य तो मोबदला ठेवावा असे सांगितले. सर्व भक्तिभाविकांनी त्याप्रमाणे केले. कारण श्री. काळे यांना तो फोटो विकायचा नव्हता. आता श्री साईनाथ महाराज व श्रीपाद श्रीवल्लभ यांचे दोन्ही फोटो मुंबई येथील जोगेश्वरी केंद्रावर आहेत.
३. ‘अजिंक्य मॅन्शन’ मध्ये कामकाज
मुंबईतील दादर येथील हेमकुंजमध्ये दिवसेंदिवस गर्दी वाढत चालली. उत्सवाला जागा कमी पडू लागली. अशा वेळी श्री. रमण देसाई यांचे मेहुणे श्री. वसंतराव कोठारे ‘अजिंक्य मॅन्शन‘ येथे तळमजल्यावर राहात असत. त्यांनी वं. दादांना आमच्याकडे कार्य का करीत नाही? अशी विचारणा केली. तेव्हा वं. दादांनी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर प. पू. बाबांचा फोटो ठेवून तेथे कार्य सुरू केले. तो हॉल शे-दिडशे माणसे बसू शकतील एवढा मोठा होता. उत्सवाच्या दिवशी आजूबाजूच्या खोल्यातून मिळून चारशे माणसे आरतीचा लाभ घेत असत. मुंबईत वं. दादांच्या मुक्कामात रविवारी तेथे पन्नाससाठ माणसांचे कामकाज होत असे. सकाळी आठ वाजता कामकाजाला गेल्यावर दुपारी तीन वाजता दादर येथील हेमकुंजमध्ये जेवायला येत. वं. दादांच्या हेमकुंजमध्ये पूर्वी मुलाखती होत. परंतु गर्दी वाढल्यामुळे मुलाखती गिरगावातील ‘अजिंक्य मॅन्शन‘ येथे होऊ लागल्या. हेमकुंज केंद्र भक्तांच्या मासिक वर्गणीतून चालत असे. त्या केंद्राची पूजाअर्जा यांची जबाबदारी काही वर्षे श्री. नाना भट्टे, श्री. कसबेकर, श्री. निरगुडकर यांनी सांभाळली.
४. पुण्यातील ‘व्दारकामाई ‘ वास्तूसाठी विभूतींचा आशीर्वाद
वं. दादांचे मार्गदर्शन आणि निराकरणाच्या माध्यमातून कार्य वृध्दिंगत होत असले तरी त्यांच्या राहत्या घराचा, जागेचा प्रश्न सुटत नव्हता. या देव कार्यासाठी जागा मिळत नव्हती. नाईक कुटुंबियांच्या घरावर कर्ज होते व त्यांच्या घरातील दोन खोल्यांत वं. दादा व लीलाताईं भाड्याने राहत होते. घर सोडण्याची सावकाराकडून वकीलातर्फे नोटीस आल्यामुळे त्यांच्याबरोबर वं. दादानांसुध्दा शनिवारातील जागा सोडणे भाग होते. त्या काळात जागा तशा खूपच स्वस्त असत, पण तेवढेसुध्दा पैसे वं. दादांपाशी नव्हते. वं. दादांच्यात अजमेरचे ख्वाजा गरीब नवाज यांचा संचार झाला. त्यांनी स्वतः खांद्यावरील शाल झोळी म्हणून भक्तांच्या पुढे पसरली आणि सांगितले की, ‘‘बाबांच्या कार्याची वास्तू होण्याकरीता ज्याला जेवढे शक्य आहे तेवढे त्यांनी या झोळीत घालावे.‘‘ त्यावेळी त्यांनी असाही आशीर्वाद दिला की, ‘‘यापुढे, येणा-या प्रत्येक भक्ताची कमीत कमी दोन खोल्यांची वास्तू होईल. जोपर्यंत बाबांची वास्तू उभी राहत नाही तोपर्यंत मी खांद्यावर वस्त्र घेणार नाही.‘‘ हेच मुंबईच्या भक्तभाविकांनाही सांगितले. त्यावेळी पुण्याला वाडे होते. व वाड्यामध्ये अनेक बि-हाडे असत. फक्त डेक्कन जिमखान्यावर प्रभात रोड सारख्या ठिकाणी थोडे बंगले होते. पुढे ओनरशीप फ्लॅटची योजना अंमलात आली व वाड्यामध्ये राहणा-या बि-हाडकरूंची दोन खोल्यांची स्वतःच्या मालकीची जागा झाली. आणि अजमेरच्या ख्वाजा गरीबनवाज यांनी दिलेला आशिर्वाद कार्यान्वीत झाला. त्याचप्रमाणे मुंबईच्या चाळींच्या जागी ओनरशीप फ्लॅट झाले व बाबांच्या आशीर्वादाची प्रचिती झाली. जीजींना बाबांच्या वास्तूसाठी पैसे देता आले नाहीत म्हणून फार वाईट वाटले. तेव्हा बाबा म्हणाले, ‘‘जीजी आम्हाला सर्वांकडून पैसे नकोत, तुमच्याकडून कार्यासाठी मुलगा हवा.‘‘ खरोखरच त्यानंतर दीपकने कार्यासाठी वं. दादांच्या बरोबर सर्व आयुष्य वेचले. आत्तापर्यंत केलेल्या कार्याची सिध्दती वं. दादा दीपकमुळेच करू शकले. बरेच प्लॉट पाहिल्यानंतर वं. दादांनी ठरविलेल्या बजेटमध्ये बसेल असा श्री. खिंवसरा यांचा प्लॉट निश्चित केला. शनिवारात या नवीन जागेचे प. पू. बाबांच्यासमोर खरेदी खत झाले व दादांच्या व प. पू. बाबांच्या आज्ञेने ‘व्दारकामाई‘ बंगल्याचा प्लॅन तयार झाला.
ती. काकी खूप आजारी होत्या म्हणून वं. दादांनी श्रावणात 20.8.1962 रोजी ‘व्दारकामाईची’ वास्तुशांत करून घेतली. पुढे दिवाळीतील पाडव्याला 29.10.1962 रोजी भक्तभाविकांसमवेत लक्ष्मीपूजन व सरस्वतीपूजन सोहळा साजरा केला.

मुंबईच्या भक्तांना राहण्यासाठी दोन दिवस 28 व 29 ऑक्टोबर 1962 रोजी सुवर्णस्मृती मंगल कार्यालय घेतले होते. रात्री आरतीनंतर संगीत क्षेत्रातील नामवंत कलावंतांनी हजेरी लावली. हा कार्यक्रम पहाटेपर्यंत चालू होता. वं. दादासुध्दा या’ कार्यक्रमाला उपस्थित होते. या संबंधीचे निवेदन 16.8.1962 रोजी काढण्यात आले.
29.11.1962 रोजी म्हणजे बरोबर एक महिन्यांनी प. पू. अजमेर शरीफ बाबांचा पहिला ‘ऊरुस संदल’ उत्सव गादीवर सुरु करण्यात आला. प. पू. हाजीमलंग बाबांच्या ऊरुसाचे प्रसाद पूजन ज्याप्रमाणे पौर्णिमेला होत असे त्याप्रमाणे या प्रसादाचे पूजन अमावास्येला करण्यास सांगितले.
५. बांद्रा येथील केंद्राची स्थापना
श्री. यशवंत तांबे (काका तांबे) यांचे देहावसान झाल्यानंतर दादर येथील हेमकुंजमधील कार्यकेंद्र वांद्रा येथील ‘लक्ष्मी नारायण निवास’ येथे हलविण्यात आले. तेथे मुंबईचे कार्यकेंद्र सुरु झाले. श्री. राम भाऊ बुश कंपनीत मुंबईला नोकरी करीत असत. हाजीमलंग बाबांनी श्री. राम भाऊ यांना ‘‘तू नोकरी सोडून हे मुंबईचे कार्य केंद्र सांभाळ. तुझ्याशिवाय विश्वासाने हे कोणीही करु शकणार नाही. कामकाज सोडून तबकात जमतील ते पैसे तू घे.‘‘ असे सांगितले. त्यावेळी तबकात फारसे पैसे जमत नसत. तरी पण त्यांनी प. पू. हाजीमलंग बाबांच्या आज्ञेनुसार नोकरी सोडली व वांद्र्याला पहाटे उठून पूजेला जाऊ लागले. त्यावेळी आता आहेत एवढे सेवक पूजेला नव्हते. रोजच सकाळ, संध्याकाळ आरती होत असे. संध्याकाळच्या आरतीच्या तयारीसाठी पुन्हा चार वाजता जावे लागे. वं. दादा कामकाजाला आले की हेमकुंजमध्येच राहात. वांद्र्यापासून वं. दीपक दादा वं. दादांच्या बरोबर असत. श्री. विजय दादा भागवत (वं. दादांचा मुलगा) पाचगणीहून मॅट्रीक होऊन पुण्याला आले. पुढे ते बी. कॉम. झाले. त्यानंतर वं. दादांनी पुढील साधना सिध्द करण्यासाठी स्वतः कामकाज बंद करण्याचा निर्णय 1977 साली घेतला. श्री. विजय दादा भागवतांना ऊरुसाच्या दिवशी प्रसाद घेऊन मुंबईला कामकाज करण्यास सांगितले. त्याचबरोबर पुण्यात वं. दादांच्या मुक्कामात वं. दीपक दादा व दुसरे सेवक कामकाज करीत. श्री. विजय दादा भागवत शनिवारी मुंबईला जाऊन रविवार व सोमवारचे कामकाज करुन परत पुण्याला येत असत. लोकांच्या अडचणींचे निवारण, कामकाज लवकर होत असे, त्यामुळे लोकांची त्यांच्यावर श्रदधा बसली व कामकाजाला गर्दी होऊ लागली. काही सिध्दतेकरीता वं. दादा जास्त करून गोव्याला असत. वं. दीपक दादा सदोदीत वं. दादांच्याबरोबर असत. त्यामुळे वं. दादांना कार्य करणे सुलभ झाले.
६. शक्तीपीठ स्थापना व साईशक प्रारंभ
दि. 30 जून 1977 ला वं. दादांनी कामकाज बंद केले. कारण त्यांना ऐहिक जगातून पारमार्थिक जगात प्रवेश करावयाचा होता. त्याप्रमाणे साधनेचा आरंभ 22 डिसेंबर 1977 साली झाला. वाडीला पहिले हवन झाले. त्यानंतरएक वर्षभर वाडीला दर पौर्णिमेला हवन होत असे. शेवटच्या पौर्णिमेला महारूद्र स्वाहाकार झाला. श्रीदत्तपंथाचे द्योतक म्हणून वं. दादांचा श्री स्वामीजींची छाटी देऊन नरसोबावाडीला गौरव करण्यात आला. 1979 सप्टेंबर मध्ये पहिले संमेलन शिरोड्याला झाले. याप्रमाणे वं. दादांनी आठ संमेलने घेऊन भक्तभाविकांना मार्गदर्शन केले. त्या संमेलनात केलेले उद्बोधक उद्बोधन आजही भक्तांना मार्गदर्शक आहे.

‘श्रीसाईशक’ चा प्रारंभ 1982 साली विजयादशमीला झाला. त्याचे प्रतिक म्हणून ‘श्रीसाईशक’ प्रतिमा तयार करुन सर्व भक्तांना पूजनासाठी दिली व अजूनही दिली जात आहे. ही प्रतिमा म्हणजे कुटुंबातील देवदेवता आहेत. 14 एप्रिल 1983 चैत्र प्रतिपदेला शक्तिपीठाची स्थापना झाली. हे सर्व कार्य सिध्दावस्थेत नेत असताना वं. दादांना शून्यावस्थेत जावे लागून अतिशय शारिरीक कष्ट सहन करावे लागले. या सर्व साधनांची सिध्दता करीत असताना त्यांचा जास्तीत जास्त मुक्काम गोव्याला असे.