सौ. लीलाताईंचा कार्यात सहभाग (वं. दादांच्या देहत्यागानंतर)

सौ. लीलाताईंचा कार्यात सहभाग (वं. दादांच्या देहत्यागानंतर) :


1 जुलै 1991 रोजी मध्यरात्री 1 वा. 40 मिनिटांनी वं. दादांनी दीपक दादांच्या खांद्यावर मान ठेवून देहत्याग केला. तो दिवस ज्येष्ठ वद्य पंचमीचा होता. ती बातमी कळताच सौ. लीलाताई श्री. नाना भट्टे व कन्या शैलजा व विद्या या कुटुंबियांसमवेत व्दारकामाईत आल्या.

बाहेर जिन्यात वं. दीपक दादा, श्री. विजय दादा भागवत, श्री. रामभाऊ व श्री. लक्ष्मणराव इ. सर्व आता काय करायचे? असा विचार करीत होते कारण दादांनी काहीच सांगितले नव्हते. वं. सौ. लीलाताई त्यावेळी स्वयंपाक घरात होत्या. वं. सौ. लीलाताईंचे अंग जड झाले. बाजूला जे कोणी होते त्यांना वं. सौ. लीलाताईंनी दादांना ठेवलेल्या हॉलमध्ये त्यांना नेण्यास सांगितले. त्याबरोबर वं. दिपक दादा, श्री. विजय दादा भागवत धावत आले. प. पू. हाजी बाबांचा संचार सौ. लीलाताईंच्यात झाला. ब-याच कालावधीनंतर संचार अवस्था झाल्यामुळे, पुढे काय करायचे ही माहिती सांगत असताना वं. सौ. लीलाताई ब-याच वेळा खाली पडत होत्या. वं. दादांना आपले निर्वाण केव्हा होणार हे माहीत असल्यामुळे त्यांनी आपल्या खोलीतील कपाटात तयारी करून ठेवली होती. हे कोणालाच माहीत नव्हते. परंतु प. पू. हाजीबाबांचा संचार झाल्यावर ते म्हणाले, दादा सामान्य व्यक्ती नसून सत्पुरूष आहेत. त्यांनी धोतर कोठे ठेवले आहे व उरूसाच्या वेळी दादा डोक्याला जो रूमाल बांधीत तो कोठे ठेवला आहे हे सांगितले. त्याचप्रमाणे साधनेच्या वेळी दादा जे कुंकू लावीत ते त्यांना लावण्यास सांगितले. प.पू. बाबांना पूर्वी घातलेला शेला आणून वं. दादांना घालण्यास सांगितला. सर्व तयारी करण्यास सांगितली. त्यांना ज्या गादीवर ठेवले होते त्या गादीसह त्यांना गाडीत ठेवून गाडी फुलांनी सजवायला सांगितली. त्यांचा देह फुलांनी सुशोभित केलेल्या गाडीत ठेवल्यावर, अंत्यदर्शन घेण्यासाठी व्दारकामाईत त्यांना ठेवले होते त्याजागी पाटावर प. पू. बाबांचा व श्री. दादांचा फोटो ठेवून समई लावायला सांगितली. प. पू. दादा साधना करीत असलेले आसन, पळीपंचपात्र, ताम्हण, कुंकवाची डबी, उदीची डबी, जपाची माळ इ. गोष्टी तेथे आणून ठेवण्यास सांगितले.

दुसरे दिवशी सकाळी प. पू हाजी मलंग बाबांनी वं. सौ. लीलाताईंच्या माध्यमात येऊन ति. वहिनींसह सर्वांचे सांत्वन केले आणि सांगितले, दादांचे इहलोकातले कार्य पुरे झाले आहे. मी तुमच्या पाठीशी आहे. तरूण पिढीने हे कार्य असेच चालू ठेवावे. वं. दीपक दादा, श्री. विजय दादा भागवत यांना आता तुमची जबाबदारी वाढली आहे असे सांगितले. दहा दिवस रोज सकाळ, संध्याकाळ श्री. साईनाथ महाराजांचे 108 वेळा नामःस्मरण करण्यास सांगितले.

सर्व दिवस पूर्ण झाल्यावर प. पू. बाबांनी वं. दीपक दादा, श्री. विजय दादा भागवत, रामभाऊ व लक्ष्मणराव यांना लीलाताईंच्या माध्यमातून औदुंबर, वाडी व सर्व दर्गे यांचे दर्शन, करून येण्यास सांगितले. त्यानंतर येणा-या गुरूपौर्णिमेला श्रीसद्गुरूनाथ दादांचा फोटो व पादुकांची स्थापना करण्यास सांगितले. श्रीसद्गुरूनाथ दादांच्या कुठल्या फोटोची स्थापना करावयाची ते सुध्दा प. पू. बाबांनी वं. सौ. लीलाताईंच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. 27 जुलै 1991 रोजी गुरूपौर्णिमेला त्याप्रमाणे पादुकांची रूद्राभिषेक करून स्थापना केली. त्यावेळी सर्व केंद्रप्रमुख उपस्थित होते. तेव्हापासून श्रीसद्गुरूनाथ दादांच्या पादुकांना भक्तांचा अभिषेक सुरू झाला. वं. दादांच्या कार्यस्तवनपर केलेल्या पदांना वं. दादांची जेष्ठ कन्या सौ. पद्मा यांचे यजमान श्री. अन्वरभाईंनी सुरेख चाली लावल्या. त्या दिवसापासून ती पदे दर मंगळवारी सर्व केंद्रावर म्हटली जातात. श्रीसद्गुरूनाथ दादांच्या देहत्यागानंतर जे कार्य झाले त्यासाठी प. पू. विभूतींनी वं. सौ. लीलाताई ‘बॉर्न मीडीयम’ असल्यामुळे . त्यांच्यावर या कार्याची धुरा सोपविली. अशा प्रकारे या दिवसापासून सौ. लीलाताईंचा वं. दादांच्या पश्चात या कार्यात पुनःप्रवेश झाला. वं. दादांनी पूर्वी त्यांच्या सर्व कार्यात सौ. लीलाताईंना का सहभागी केले होते याचा उलगडा सौ. लीलाताईंना झाला. तेव्हापासून हे कार्य अविरपणे चालू ठेवणे व वृध्दींगत करण्याची अवघड जबाबदारी सौ. लीलाताई समर्थपणे पार पाडीत आहेत. वं. दीपक दादा व श्री. विजय दादा भागवत यांना प. पू. विभूती वेळोवेळी मार्गदर्शन करीत व त्यानुसार ते कार्य करीत. ‘‘आम्ही जर लीलाताईंच्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन करीत असलो तरी ते सर्वांना सांगण्याची आवश्यकता नाही. कार्य तुमच्याकडून करवून घेणार आहे. आम्हाला कामकाजासाठी कोणाला भेटावयाचे असल्यास तशी पूर्वसुचना तुम्हाला देईन व तुम्हा दोघांपैकी किंवा अन्य जबाबदार सेवक असल्याशिवाय कुणालाही भेटणार नाही.‘‘ असे विभूतींनी सांगितले होते.

१. कार्यार्थ प. पू. जिलानी बाबांचे मार्गदर्शन

कार्यार्थ वं. सौ. लीलाताईंच्या माध्यमातून मार्गदर्शन

नागपंचमीच्या दिवशी सकाळी प. पू. महंमद जिलानी बाबांचा वं. सौ. लीलाताईंच्यात संचार झाला. त्यांनी वं. दीपक दादांना त्यांच्या हातात विडा व श्रीफळ देऊन परत देवपाशी ठेवण्यास सांगितले. ‘‘आजपासून हे कार्य प. पू. हाजीमलंग बाबांनी माझ्याकडे सोपविले आहे, तुम्ही काळजी करू नका.‘‘ असे त्यांनी वं. दीपक दादा व ति. वहिनींना सांगितले. आरती सुखटणकरने श्रीसद्गुरूनाथ दादांच्या बरोबर राहून बरीच वर्षे त्यांची सेवा केली होती. त्यांच्या निर्वाणानंतर ती खूपच बेचैन झाली. कशातही लक्ष लागेना. तेव्हा प. पू. महंमद जिलानी बाबांनी, श्रीसद्गुरूनाथ दादांनी सांगितल्याप्रमाणे गोव्याला जाऊन शाळेत नोकरी कर असे सांगितले. त्याप्रमाणे तिला गोव्याला शाळेत नोकरी मिळाली. नागपूरचे श्री. बाळ, यांना वं. दादांनी ‘गुरूप्रसाद‘ चे इंग्रजीत भाषांतर करण्यास सांगितले होते. ते भाषांतर दादांच्या निर्वाणानंतर 12 डिसेंबर 1991 ला छापून पूर्ण झाले. त्याचा प्रकाशन समारंभ प. पू. महंमद जिलानी बाबांच्या मार्गदर्शनानुसार श्री. आल्मेडा यांच्या हस्ते दादर माटुंगा कल्चरल हॉलमध्ये झाला. त्यावेळी त्यांचा सत्कारही केला.


२. ‘साई-स्मृती‘ मध्ये केंद्राचे स्थलांतर

साई-स्मृती येथील देव्हारा

वांद्रा येथील कार्यकेंद्राची जागा घरमालकाला परत हवी असल्याचे पत्राने कळविले. काही जणांनी आपण येथे बावीस वर्षे कार्य करीत आहोत तेव्हा कोर्टात जाऊ शकतो असा सल्ला दिला. परंतु प. पू. बाबांनी वं. सौ. लीलाताईंच्या माध्यमातून ‘‘तसे न करता आपण त्यांची जागा त्यांना परत देऊ आणि वांद्रा येथील कार्यकेंद्रांचे जोगेश्वरी येथे स्थलांतर करू. जोगेश्वरीच्या जागेची दुरूस्ती करून महापालिकेची परवानगी काढून व सर्व गोष्टी कायदेशीर होईपर्यंत वांद्रा येथील जागेला मुदत वाढ मागून घ्यावी,‘‘ असे मार्गदर्शन केले. त्यावेळी वं. दीपक दादा, श्री. विजय दादा भागवत, श्री. रामभाऊ, श्री. लक्ष्मणराव व डॉ. वाघ उपस्थित होते. जोगेश्वरी येथील जागा डॉ. वाघ यांनी काही वर्षापूर्वी त्यांच्या व्यवसायाकरिता घेतली होती. परंतु वं. दादांच्या इच्छेनुसार ती जागा कार्यकेंद्रासाठी देण्याचे ठरविले होते. वं. दादा असे पर्यंत हे काम पूर्ण झाले नाही. वं. दादांनी या वास्तूचे नाव ‘साई-स्मृती’ असे सांगितले होते. वांद्रा येथील जागेत फोटो हलविण्यापूर्वी पेढे, प्रसाद पानसुपारी विडा व श्रीफळ ठेवण्यास सांगितले. बावीस वर्षे वांद्रा येथील कार्यकरत असलेल्या केंद्राचे स्थलांतर 7 एप्रिल 1992 रोजी जोगेश्वरी येथे झाले. श्रीसद्गुरूनाथ दादांनी दिलेल्या संगमरवरी फरशीवर ।। ॐ श्री साईनाथाय नमः।। असा मंत्र कोरला. नंतर त्या फरशीचे पूजन करून ती मुख्य प्रवेशव्दारावर लावण्यात आली. नंतर श्रीनवनाथ पादुकांवर सर्व गुरूबंधुभगिनीं समवेत श्री. रामभाऊंनी अभिषेक केला. नंतर आरती झाली. सुरूवातीला पाच आठवडे केंद्रावर आरती, साधना व अनुष्ठान एवढाच कार्यक्रम प. पू. बाबांच्या आज्ञेनुसार होत असे. कामकाज पाच आठवडे बंद होते.

नवी वास्तु असल्यामुळे तेथे शक्तीसंचय होणे आवश्यक होते. हे सर्व मार्गदर्शन वं. सौ. लीलाताईंच्या माध्यमातून प. पू. महंमद जिलानी बाबांनी केले. प. पू. महंमद जिलानी बाबा व सौ. लीलाताईंच्या माध्यमात जेव्हा प्रथम आले तेव्हाच त्यांनी गुरूपूजन व गुरूदक्षिणा घेणार नाही असे स्पष्ट केले होते. श्रीसद्गुरूनाथ दादांच्या निर्वाणानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी मुंबईच्या चेंबूर येथील आर. सी. एफ. हॉलमध्ये नोव्हेंबर 1993 मध्ये वं. दीपक दादांनी सेमिनार घेतले. जवळ जवळ पाच-सहाशे भक्तभाविकांनी सेमिनारचा लाभ घेतला. वं. दादाच सेमिनार घेत आहेत असे सर्वांना वाटले. ‘दिपकदादा‘ या शब्दात वं. दादा पूर्णपणे सामावलेले आहेत याची प्रचिती आली. वं. दादा म्हणत असत, ‘प. पू. बाबांना जे सांगावयोच आहे ते मी सांगतो, मला जे सांगावयाचे आहे ते मी नंतर सांगीन.‘ याची अनुभूती आली. पूर्वीप्रमाणे महिन्यातील पहिल्या रविवारी कामकाज बंद ठेवून ज्ञानसंवेदना वर्ग चालू केला.

३. ‘तारकमंत्राची‘ सिध्दता

‘तारकमंत्राची’ सिध्दता

प. पू. हाजीमलंग बाबांच्या उरूसाच्या दिवशी वं. दीपक दादांना लाल शाईचे पेन व कागद, विडा नारळ प. पू. बाबांच्या समोर ठेवण्यास सांगितले. सकाळी आरतीला आलेले सर्वजण गेल्यानंतर वरील आज्ञा झाली. वं. सौ. लीलाताईंच्या माध्यमातून प. पु. हाजीबाबा म्हणाले, ‘‘वं. दादांचे नामःस्मरण सिध्द करण्यासाठी सर्व दर्ग्यात जाऊन यावयाचे आहे. प्रथम शिरडीला जावयाचे आहे. नंतर कोठे जावयाचे ते शिर्डीला सांगितले जाईल.‘‘ त्यानंतर प. पू. हाजीमलंग बाबांनी सात जणांची नावे सांगितली. दिपक, विजय भागवत, नित्यानंद, डॉ. वाघ, जीजी व वं. सौ. लीलाताई कधीच कुणाबरोबर एकट्या जात नसल्यामुळे श्री. नानांना बरोबर घेण्यास सांगितले. मंत्री यांस त्यांची साधना कधीही चुकली नाही म्हणून बरोबर येण्यास सांगितले.

वं. दादांच्या पश्चात सौ. लिलाताईंनी जे कामकाज केले त्यामध्ये त्यांना यजमान ती. नाना भट्टे यांचे अमोल सहकार्य लाभले.

शिर्डीला पोहोचल्यावर सर्वजण जवळच एक खोली भाड्याने घेऊन कपडे बदलून अब्दुलबाबांच्या झोपडीत गेले. तेथे साधना केली. नंतर सगळे शिर्डी येथील व्दारकामाईत गेले व तेथे ।। ॐ श्रीसद्गुरूनाथ दादाय नमः।। हा तारक मंत्र सिध्द झाला. प्रत्येक ठिकाणी दिवस व रात्र प्रवास करून, रात्री दर्ग्याजवळ असलेल्या हॉटेलमध्ये रहात असत. सकाळी स्नान करून धूतवस्त्र घालून दर्ग्यात ठीक 9 वाजता जात असत. प्रत्येक दर्ग्यात ‘‘तुमची वाट बघतच आहोत” असे तेथील मुजावर म्हणत. दर्ग्यात गेल्यावर प्रथम वं. दीपक दादा लिहिलेला कागद समाधीवर ठेवीत असत व तेथील मुजावर तो वं. दीपक दादांकडे परत देत असत. सर्वजण विडे लावून, फुले वाहून 11 वेळा ॐ कार करून 21 वेळा ।। ॐ श्रीसद्गुरूनाथ दादाय नमः।। या तारक मंत्राचा उच्चार करीत असत. प्रत्येक दर्ग्यात त्या त्या विभूती वं. सौ. लीलाताईंच्या माध्यमातून सेवकांच्या डोक्यावर हात ठेवीत व चार उपदेशाचे शब्द सांगत असत. त्याचा उल्लेख ओमकारचाचांनी मंगळवारच्या विभूतींच्या आरतीत केला आहे. ‘‘मलंगबाबा प्रेमसागरा..” ‘‘सलीमबाबा फत्तेपुरीचे..” ‘‘कुतुबबाबा गुरुराया रे..” इ. दिल्लीत प. पू. बाबांनी सर्वांना विचारले होते की पंतांच्याकडे (बाळेकुंद्रीला) तुम्ही जाऊ शकाल का? त्यावेळी सर्वांनी जाऊ असे सांगितले. त्याप्रमाणे सर्वजण बाळकेकुंद्रीचे दर्शन घेऊन आले.

प. पू. महंमद जिलानी बाबांनी वं. सौ. लीलाताईंच्या माध्यमात येऊन ती. जीजींना कार्याची सुरूवात (पूर्वार्ध) माहीत असल्यामुळे त्यांना विभूतींच्यावर काव्य करण्यास सांगितले. डॉ. वाघांना उत्तरार्ध माहीत असल्यामुळे त्यांना मुंबईहून पुण्याला प्रवास करताना विभूतींवर काव्य करण्यास सांगितले. उदा. ‘’गुरूराया धन्य रे गुरूराया’, ‘कसे करू गुणगान गुरूवरा’ या ती. जीजींनी केलेल्या आरत्या सर्वश्रुत आहेत.

४. वं. दादांचा शुभदिन सोहळा


20 जून 1992 जेष्ठ कृष्ण पंचमी या शुभदिनी ।। ॐ श्रीसद्गुरूनाथ दादायनमः।। हा तारकमंत्र सर्व भक्तभाविकांना देण्याची वं. दीपकदादांना आज्ञा वं. सौ. लीलाताईंच्या माध्यमातून झाली. श्री. विजयदादा भागवत यांना ‘श्रीसद्गुरूनाथ दादा महाराज पीठ‘ या नावाची मेटल प्लेट करून श्रीसद्गुरूनाथ दादांच्या फोटोवर लावण्यास सांगितली.


तीन चार दिवस आरतीच्या चाली बसविण्यात गेले. 20 जूनला लॉ कॉलेजमध्ये स्वयंपाक करण्यास जागा व भक्तभाविकांना उतरण्यासाठी खोल्या घेतल्या होत्या. शिवाय सुवर्ण स्मृती कार्यालय आणि अन्य ठिकाणीही भक्तांची उतरण्याची सोय केली होती. जवळवजळ सहा हजार भक्त कुटुंबियांसह तारकमंत्राची दिक्षा घेण्यासाठी आले होते. प्रथमतः सनईवादन झाल्यानंतर अभिषेक झाला. त्यानंतर विभूतींवर लिहिलेला आरतीचा संच म्हणून झाल्यावर बसल्याजागीच दिपकने श्रीसद्गुरूनाथ दादांच्या तारकमंत्राची (नामःस्मरणाची) दिक्षा दिली. पहिली बॅच ठीक 11 वाजता व्दारकामाईतून लॉ कॉलेजकडे महाप्रसादाला बाहेर पडली. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सर्व भक्तभाविकांनी तारक मंत्राच्या दिक्षेचा लाभ घेतला. वं. सौ. लीलाताईंच्या माध्यमातून हा तारक मंत्र प. पू. जिलानी बाबांनी दैनंदिन साधनेमध्ये 21 वेळा म्हणण्यास सांगितले. यानंतर श्री. विजय दादा भागवत यांना सर्व केंद्रावरील भक्तभाविकांना या कार्यात मार्गदर्शन करणा-या विभूतींच्या दर्ग्याला व सातारा येथील तेली महाराज व भैरवनाथ यांच्या दर्शनाला घेऊन जाण्यास सांगितले.


वं. दादांनी साधन सिध्दतेकरीता कामकाज बंद केले होते त्यामुळे ज्या जुन्या भक्तांची अवघड कामे सात पिढीतील प्रखर दोषांमुळे झाली नव्हती ती सर्व कामे प. पू. महंमद जिलानी बाबांनी वं. सौ. लीलाताईंच्या माध्यमात येऊन नियुक्त सेवकांना मार्गदर्शन करून त्यांच्याकडून करवून घेतली.सौ. लीलाताईंच्या झालेल्या आज्ञेनुसार बेळगावातील श्री. विजय पेटा यांच्या कुटुंबियांचे निराकरण कले गेले.

५. वं. सौ. लीलाताईंच्या मार्गदर्शनाने रत्नागिरी केंद्राची स्थापना


प. पू. महंमद जिलानी बाबांनी वं. लीलाताईंच्या माध्यमातून ती. दीपकदादांना रत्नागिरी केंद्राचे काम करण्यास सांगितले. त्यासाठी कामकाज करणारे सेवक बरोबर असतील तर मध्यस्थाला त्रास कमी होईल असे सांगितल्यामुळे दीपकदादा, विजयदादा भागवत व इतर सेवक बरोबर होते. तेथे गेल्यावर नव्या केंद्राच्या जागेतील बाधा श्री. देशपांडे यांच्या घरातील सातपिढ्यातील दिवंगत स्त्री-पुरूष सौ. लीलाताईंच्या माध्यमात येऊन त्यांनी सर्व गोष्टींचा उलगडा केला ज्यामुळे नविन केंद्र पूर्ण होण्यास अडथळा होत होता. या सर्व बाधा काढल्या गेल्या. त्यानंतर अर्धवट राहिलेले केंद्राचे काम पूर्ण झाले. याप्रमाणे सौ. लीलाताईंनी अनेक भक्तांच्या कुटुंबातील प्रश्नांचे निराकरण केले.



६. वं. सौ. लीलाताईंच्या मार्गदर्शनाने वं. दादांच्या पादुकांचे पूजन

सद्गुरूनाथ दादांच्या पादुकांवर अभिषेक करतांना वं.
दिपक दादा

वं. दादांच्या मार्गदर्शनाप्रमाणे घोष कुटुंबिय अमेरिकेत डेव्हन पोर्ट येथे स्थायिक झाले होते. इंदिरा घोष यांनी अमेरिकेत सेमिनार घ्यावे अशी इच्छा पुण्यात प. पू. महंमद जिलानी बाबांपाशी व्यक्त केली होती. प. पू. बाबांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे श्रीसद्गुरूनाथ दादांच्या पादुकांची स्थापना करण्याचे व सेमिनार घेण्याचे ठरवले. त्यानुसार वं. सौ. लीलाताई, ती. दीपकदादा, विजय दादा भागवत, जीजी, श्री. बाबूजी (दिल्ली) यांनी अमेरिकेला जावे असे ठरले. पादुकांची स्थापना होण्यापूर्वी दिल्ली केंद्र सोडून त्या पादूका भक्तभाविकांच्या दर्शनार्थ सातारा पासून सुरूवात करून क-हाड, बेळगाव, गोवा, रत्नागिरी, नाशिक, अंत्रोली, जळगाव, अमरावती, नागपूर, पंढरपूर, विजापूर, पुणे आणि मुंबई अशा सर्व केंद्रावर नेण्यात आल्या. वं. सौ. लीलाताई, ती. दीपक दादा, श्री. विजय दादा भागवत, ती. नाना व इतर सेवक पादुकांसमवेत सर्व केंद्रावर गेले होते.

प्रत्येक केंद्राच्या आवरात रांगोळी व फुलांचा सडा घातलेला असे. गाडीतून उतरल्यावर केंद्राच्या प्रवेशव्दारात वं. दीपक दादा श्रीसद्गुरूनाथ दादांच्या पादुका घेऊन, श्री. राम भाऊ दादांचा फोटो घेऊन व श्री. विजय दादा भागवत, प. पू. साईनाथ महाराजांचा फोटो घेऊन केंद्राच्या प्रवेशव्दारापाशी उभे राहत. पाच सुवासिनी त्या तिघांच्या पायावर दुध, पाणी व हळदकुंकू वाहून कपाळाला कुंकू लावून झाल्यानंतर केंद्रात प्रवेश होत असे. हा कार्यक्रम प्रत्येक केंद्रावर सकाळी होत असे. कार्यकेंद्रावर पादुकांची पूजाअर्चा, आरती केंद्रप्रमुख पत्नीसह करीत. दर्शनाला येणा-या सर्व भक्तभाविकांना प्रत्येक केंद्रावर महाप्रसाद देण्याची व्यवस्था करण्यात आली होती.


७. पंढरपूर सोहळा


पंढरपूरच्या केंद्रावरील पादुका-पूजन सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे पंढरपूरकरांनी दिलेल्या छोट्या चांदीच्या पालखीत श्रीसद्गुरूनाथ दादांच्या पादुका ठेवून ती चांदीची छोटी पालखी मोठ्या पालखीत ठेवून भव्य मिरवणूक काढली. मिरवणुकीपुढे वासुदेव नाचत होते. पंढरपुरातील बरेच भक्त भाविक टाळ घेऊन दिंडीप्रमाणे नाचत होते. अंत्रोलीहून आलेल्या गुजराथी भक्तभाविकांनी गरबा (दांडीया) खेळला. त्यात पुरूष व स्त्रियांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला. सर्व केंद्रांवरून जवळ जवळ दोन हजार भक्तभाविक उपस्थित होते. त्या सर्वांची राहण्याची व जेवणाची सोय पंढरपूरातील भक्तभाविकांनी केली होती. त्याच दिवशी संध्याकाळी चार वाजता श्री विठोबा रखमाईच्या दर्शनाचा लाभ सर्व उपस्थित भक्तभाविकांना मिळावा म्हणून खास व्यवस्था करण्यात आली होती. मंदिरातील पुजारी पंढरपूरच्या केंद्रावर येत असल्यामुळे मंदिर फक्त आपल्या भक्तांसाठी उघडे ठेवण्यात आले होते. त्यामुळे सर्वांना श्री विठोबा रखमाईच्या दर्शनाचा लाभ अगदी जवळून झाला.

मुंबई येथील जोगेश्वरी केंद्रावरील कार्यक्रम शिस्तबध्द पध्दतीने पार पडला. पुढे त्या पादुका ‘डेव्हनपोर्ट‘ येथे आपल्याकडे येणारे भक्त जाल टाटा व नर्गिस टाटा यांच्याबरोबर दिपक दादांची बहिण सौ. प्रभात गिंडे यांच्या घरी पाठविल्या. या पादुका अमेरीकेत घेऊन जाण्यासाठी दिल्लीचे केंद्रप्रमुख विजय वर्मा यांचे नाव प. पू. जिलानी बाबांनी निश्चित केले होते. परंतु त्यांचे पासपोर्ट - व्हिसाचे काम इतक्या लवकर होण्याची शक्यताच नव्हती. पण विजय वर्मांनी सांगितले की ‘‘हे पासपोर्ट व्हिसाचे काम प. पू. बाबांच्या आशिर्वादाने एरवी ज्या कामाला कमीत कमी 2-3 महिने लागतात ते काम एका दिवसात झाले. ‘‘ती. जीजी, श्री. व सौ. प्रभात गिंडे, दिल्लीचे ती. बाबूजी यांनी त्या पादुकांची स्थापना शनिवार दि. 3 जुलै, 1993 रोजी केली. त्या दिवशी गुरूपौर्णिमा होती. श्री. जाल टाटा यांच्याबरोबर वं. दीपक दादांनी सेमिनारसाठी आवश्यक ती माहिती इंग्रजीतून पाठविली होती. ज्या दिवशी श्रीसद्गुरूनाथ दादांच्या पादुकांची स्थापना झाली त्या दिवशी तेथे खूप पाऊस झाला. मिसिसीपी नदीला पूर आला व दुथडी भरुन वाहू लागली. श्रीसद्गुरूनाथ दादांच्या पादुकांची ज्यावेळी व्दारकामाई (पुणे), डेव्हनपोर्ट (अमेरिका) आणि साईनिकेतन (दिल्ली) या तिन्ही ठिकाणी स्थापना झाली त्यावेळी तेज तत्व प्रखर झाले. त्या तेज तत्वाची प्रखरता कमी करण्यासाठी आपतत्वाची आवश्यकता असते व त्यानुसार मुसळधार पाऊस पडला. त्यावेळी सर्वांना असह्य उष्णता जाणवत होती ती कमी झाली. अशा त-हेने डेव्हनपोर्टला श्रीसद्गुरूनाथ दादांच्या पादुकांची स्थापना व सेमिनार झाले. यावेळी प. पू. बाबांच्या शक्तीचा महिमा जरी अनाकलनीय असला तरी त्यात सामावलेले गुरूशक्तीचे अमोल सामर्थ्य जाणवल्याशिवाय राहात नाही.

बालकसंमेलन

बालकसंमेलन व मार्गदर्शन वं. दिपक दादा
बालक संमेलनातील साधना

पुढील पिढीतील मुलांवर चांगले संस्कार व्हावेत या हेतूने 10 ते 16 या वयोगटातील मुलांसाठी एक चार दिवसाचे निवासी शिबीर पुणे येथील लॉ कॉलेजमध्ये 17.11.93 ते 21.11.83 मध्ये आयोजित केले होते. निरनिराळ्या केंद्रावरून एकूण 600 मुलांनी याचा लाभ घेतला. या शिबिरात आरोग्यविषयक, हस्तव्यवसाय, शिवणकाम याविषयक मार्गदर्शन केले गेले. विविध क्षेत्रातील तज्ञांच्या विचारांचा मुलांना लाभ झाला. वं. सौ. लीलाताईंच्या माध्यमातून प. पू. बाबा मुलाखत घेऊन लहान मुलांना मार्गदर्शन करीत असत. सकाळी योगासने, साधना, मुलाखत याबरोबरच नाश्ता जेवण असा भरगच्च कार्यक्रम असल्यामुळे मुले या संमेलनांत खूपच रमली होती.

सौ. लीलाताईच्या माध्यमातून कार्याची व्याप्ती वाढत होती. कार्य वृध्दिंगत होत होते. त्यातील भाग म्हणजे क-हाड येथील श्री पेंढारकर यांच्या घरातील श्रीदत्तमंदिराचा जीर्णोद्धार होय. त्या मंदिराचे काम रेंगाळलेले होते. प. पू. जिलानीबाबांच्या मार्गदर्शनाने ते कार्य पूर्णत्वास गेले व तेथे दत्तजयंतीचा उत्सव केला गेला. तेथे तीन दिवसाचे संमेलन घेतले गेले. वं. दीपकदादांचा पन्नासावा वाढदिवस तेथे साजरा करून वं. दीपकदादांविषयी असणारी कृतज्ञता व्यक्त केली गेली. हे दत्तमंदिराचे काम म्हणजे वं दादांच्या कामकाजातील जी अवघड राहून गेलेली कामे होती त्यातील हे एक होते.

शक्तिपीठ तपःपूर्ति सोहळा

वं. दादांच्या देहत्यागानंतर ही त्यांनी सुरू केलेले कार्य जोमाने पुढे चालू होते. शक्तिपीठ स्थापना होऊन चैत्र शुद्ध प्रतिपदा शनिवार दि. 1 एप्रिल 1995 श्री साई शक 13 या दिवशी बारा वर्षे पूर्ण झाली. तेथे असलेला शक्तीसंचय कायम रहावा म्हणून तेथे पुन्हा शक्तीला आवाहन सोहोळा करण्यात आला. त्या शक्तीचे माध्यम शब्दब्रम्ह असून आरती व ॐ कार साधना यातून तिचे कार्य व्हावे अशी योजना केली गेली.

मूळ शक्तीपीठाचे कार्य श्री सद्गुरुनाथ दादांनी केले त्यावेळी त्यांच्यावर जो आघात झाला तसा सौ. लीलाताई व ती. दिपक दादांवर होऊ नये म्हणून ही शक्ती अंशाअंशाने प्रवाहित केली गेली. तत्पूर्वी सर्व केंद्रावर ज्या भक्तभाविकांना तपःपूर्ती सोहळ्याला यावयाचे आहे त्यांनी आठवड्यातून एक दिवस याप्रमाणे कार्यकेंद्रावर एकवीस अनुष्ठाने केली पाहिजेत त्यामुळे 1 एप्रिलला आवाहन केलेली शक्ती प्रत्येक भक्तात अंशरूपाने धारण होईल असे मार्गदर्शन प. पू. महमद जिलानी बाबांनी केले होते.

शक्तीपीठ सोहळा सुरू होण्यासाठी काही सेवकांना अकरा दिवसाचे अनुष्ठान करण्यास सांगितले होते. तेव्हा श्री मंगेशी व श्री शांतादुर्गा यांचे दर्शन घेऊन येण्यास सांगितले. त्या दिवशी शांतादुर्गेला श्वेतवस्त्र परिधान केले होते. नेहमी दर्शनाला जाणा-यांनी आश्चर्य व्यक्त केले. यावरून श्री सद्गुरुनाथ दादांनी प्रतिमेमध्ये देवदेवतांची शक्ती सामावून घेण्यासाठी केलेल्या आवाहनाला त्यांची मान्यता असल्याची साक्ष पटते.

या सोहळ्यापूर्वी पहिल्या नऊ दिवसात श्री नवनाथांपैकी दररोज एका नाथांना आवाहन करून नवनाथ नामस्मरणाचा अभिषेक शक्तीपीठात केला जात होता. पहिले पाच नाथ पंचतत्वांनी युक्त असून पाच दिवस रोज एक एक तत्वाला आवाहन केले गेले व नंतरचे चार दिवस पाचही तत्वे एकत्र पण वेगवेगळ्या प्रमाणात आवाहनीत केली गेली. या नऊ दिवसात साधना करणा-या सेवकांना वेगळे अनुभव आलेच पंरतु त्या परिसरातील रोजचे हवामानही बदलल्याचा अनुभव आला म्हणजे नऊ दिवस नवनाथ अनुष्ठान, साधना व दहाव्या व अकराव्या दिवशी प. पू. बाबांच्या नामस्मरणाचा अभिषेक व साधना असे एकूण सुमारे सोळा तासांच्या साधनेनंतर शक्ती आवाहन पूर्ण झाले. शक्तीपीठ सोहळा व शक्तीपीठ स्थापना याचे तात्विक विवेचन वं. दीपकदादांच्या “सुमनांजली” या पुस्तकात आहे.

1 एप्रील 1995 चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी या सोहळ्यासाठी साईधामच्या आवारात व समोरील भव्य पटांगणात अलिशान मंडप घातला होता. दोन हजार भक्तभाविक बसू शकतील इतकी क्षमता असलेला हा मंडप होता. मंडपाच्या मध्यभागी गुरूभगिनींनी भव्य रांगोळी घातली होती. दोन हजार मंडळीची जेवणा-खाण्याची सोय अतिशय चोखपणे केली होती.


शक्तिपीठ तपःपूर्ति सोहळा व त्याप्रित्यर्थ आलेले भक्तगण

साईधामची वास्तु विस्तारीत करण्यास ज्यांचे सहाय्य लाभले त्यांचा योग्य तो सन्मान केला गेला. ज्या शक्तीपीठातून पुढील 100 वर्षांच्या कार्याची तरतूद होणार होती त्यावर कोणाचेही ऋण असता कामा नये हा त्यामागील उद्देश होता. शक्तीपीठ सोहळा अतिशय उत्तम त-हेने, तितकाच नेटकेपणाने व देखणा असा साजरा झाला.

८. कार्याप्रित्यर्थ परदेश दौरा

डेव्हनपोर्ट (अमेरिका) सेमिनार

अमेरिकेत डेव्हन पोर्ट येथे इंदिरा घोष यांचे घरी श्री सद्गुरुनाथ दादांच्या पादुकांची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर तेथे सेमिनार घेण्यासाठी इंदिरा घोष यांनी मुंबई-पुणे येथील काही सेवकांना आमंत्रित केले. तसेच लंडन येथील श्री उनवणे, टोरेन्टो येथील श्री चंद्रकांत उदवाडिया यांच्याकडील सेमिनारसाठी आमंत्रित केले. त्यानुसार व्हिसाचे काम होऊन सौ. लीलाताई, वं. दीपकदादा, श्री विजयदादा भागवत, विजय वर्मा यांचा लंडन-कॅनडा टोरॅन्टो-अमेरिका असा एकूण साडेतीन ते चार महिन्यांचा परदेश गमनाचा दौरा नियोजित केला गेला. या परदेश दौ-यात सौ. लीला ताईंच्या माध्यमातून अनेकांची कामे पूर्ण झाली.

तेथील वास्तव्यात सौ. लीलाताई वगैरे सर्वांनी लंडन येथील स्पीरीच्युअल इन्स्टिट्युट ला भेट दिली. तेथील संस्थेत हल्ली जे मध्यस्थ काम करीत आहेत त्यांचे फोटो लावले आहेत. ते फोटो पाहिल्यावर सौ. लीलाताईंनी सांगितले की त्यांच्याकडे कार्य करण्यासाठी येणारे आत्मे चौथ्या स्पिअर मधील आहेत. तर आपल्याकडे येणा-या विभूती सप्तलोकांतून येत असल्यामुळे त्यांचे कार्याचे स्वरूप खूपच वेगळे आहे. तेथे सौ. लीलाताईंना खूप त्रास झाला.

कॅनडा

लंडन येथील मुक्कामानंतर कॅनडा येथील उदवाडिया यांच्या जागेत नवरात्रात श्री सद्गुरुनाथ दादांच्या पादुकांची स्थापना केली. उदवाडिया यांच्या जागेत सौ. लीलाताई जाण्यापूर्वी, वं. दादांच्या पादुका स्थापन करण्यापूर्वी घरात बसविलेल्या काचांना बंदुकीने गोळ्या घालाव्यात त्याप्रमाणे असंख्य तडे जात असत. त्यांच्या घराच्या प्रवेशद्वारावर अचानक अलार्म होऊन दरवाजा उघडला जाई. आवारात कामासाठी येणा-या लोकांच्या गाड्यांचे टायर पंक्चर होत. गाड्या अचानक बंद पडत. ड्रेनेज सिस्टिम अचानक बिघडून आवारात पाणीच पाणी साठत असे. बेसमेंटमध्ये रात्री माणसं चालत असल्याचा भास होई. असे अनेक प्रकार त्या जागेत होत असत. सौ. लीलाताई त्यांच्या घरी वास्तव्यास असतांना एका रात्री त्या झोपल्या असताना त्यांना एकदम जागे करून दोन ख्रिश्चन व्यक्ती त्यांच्यासमोर उभ्या राहिल्या. व त्यांनी सांगितले की 'ते दोघे भाऊ-भाऊ असून त्यांचे घरातील मालमत्तेवरून खून झाले आहेत व त्यांना त्याच जागेच्या आवारातील दोन टोकांना पुरले आहे. ते घर आतापर्यंत चाळीस जणांनी घेतले व परत विकले कारण त्या जागेत कुणालाच यश आले नाही. डोक्याला फडके बांधलेली एक म्हातारी इंडियन व्यक्ति आली व त्या व्यक्तीने आम्हाला हाकलविले.' त्या दोघांनी आपली स्वतःची नावेही सांगितली. ही सर्व माहिती श्री उदवाडियांना सांगितल्यावर त्यांनी ही माहिती पडताळून पाहिली ती सर्व माहिती बरोबर निघाली. यावरून वं. दादांनी केलेल्या कार्यसिद्धतेचा प्रत्यय येतो.

येथील सेमीनारमध्ये आलेल्या एका गुजराथी गृहस्थांनी सांगितलेला अनुभव वं. दादांच्या कार्याची प्रचिती देणाराच आहे. ते गुजराथी गृहस्थ मुंबई येथील मलबार हीलवर आपल्या मुलीकडे राहात असत.

ते दत्तभक्त असल्याने गुरूचरित्राची पारायणे करीत असत. तरी त्यांचे प्रश्न सुटले नव्हते. मानसिक शांतता लाभत नव्हती. एक दिवस दुपारी त्यांच्या घरी पांढरा झब्बा व पायजमा घातलेली एक व्यक्ति आली व त्यांना म्हणाली “तू पुढील महिन्यात मुलाकडे कॅनडाला जा तेथे तुझे काम होईल.” त्यांनी पाणी मागितले ते पाणी घेऊन परत येईपर्यंत ती व्यक्ती तेथे नव्हती. त्यांचा टोरॅन्टो येथे राहणारा मुलगा श्री उदवाडियांकडे कामकाजाला येऊन गेला होता. ते गुजराथी गृहस्थ त्यांच्या घरी येऊन गेलेल्या व्यक्तिने सांगितल्याप्रमाणे आपल्या मुलाकडे कॅनडाला आले व मुलाला सर्व हकिकत सांगितली. मुलाने वडिलांना श्री उदवाडिया यांच्या घरी गुरूवारी आरतीला आणले. श्री सद्गुरूनाथ दादांचा फोटो पाहिल्यावर ते म्हणाले हीच व्यक्ती आमच्याकडे आली होती. व तिनेच माझे काम येथे होईल असे सांगितले. आरती झाल्यावर त्यांना गुरूस्थान प्राप्त झाल्याचा आनंद झाला.

श्री उदवाडियांकडे जसे सेमिनार घेतले तसेच न्युजर्सी, सॅनफ्रान्सिसको, वॉशिंग्टन, शिकागो, फ्लोरिडा अशी प्रत्येक ठिकाणी दोन किंवा तीन दिवसांची सेमिनार घेतली. या सर्व ठिकाणी श्री सद्गुरूनाथदादांच्या कार्याचा उद्देश साधनेची (मेडिटेशन) जीवनात आवश्यकता यांची माहिती सांगितली. प्रत्येक ठिकाणी त्यांचे कामकाज करून आरती, साधना व मुलाखत होत असे. या सेमिनारमध्ये तेथील स्थानिक अमेरिकन लोकांचाही सहभाग असे. तेही शाकाहार घेत असत. या मुलाखतीच्या विषयात साधनेपासून होणारे फायदे, साधनेची पद्धत, ऋणानुबंध, सर्व प्रतिमा यांचा समावेश असे. वं. दीपकदादा मरणोत्तर जीवन, सप्तलोक याविषयी विवेचन करीत असताना शंका निरसन करीत असताना सौ. लीलाताईंना इंग्रजी येत नसूनही त्या अचूक उत्तरे देत होत्या. सर्वांना आश्चर्य वाटत असे. एकूण कार्य वृध्दिंगत होण्यासाठी केलेला हा परदेश दौरा पूर्णतः यशस्वी ठरला.

नाशिक येथील केंद्राचा वास्तुशांत समारंभ दीपकदादांच्या उपस्थित झाला. 29/08/1996 रोजी तेथील केंद्राचे उद्घाटन झाले. तेथे मंत्री कुटुंबिय, पुणे इतर सेवक, या सोहोळ्यास हजर होते.

नाशिक कार्यकेंद्र

कार्याचा व्याप वाढत असताना एक मोठा आघात सोसावा लागला. तो म्हणजे 20 मार्च 1997 रोजी वं. दीपकदादांचे निधन झाले.

वं. दीपकदादांनी आजारपणाची पर्वा न करता बेळगाव येथे संमेलन घेतले. त्या संमेलनाचा 600 भक्तभाविकांनी लाभ घेतला. हे वं. दीपकदादांनी घेतलेले शेवटचेच संमेलन ठरले.

वं. दादांच्या कार्यात सतत त्यांच्याबरोबर असणारे त्यांचे जवळचे शिष्य म्हणजे वं. दीपकदादा मंत्री! दीपक दादांना त्यांच्या मातोश्री ती. जीजींनी शालेय वयातच वं. दादांकडे सोपवले आणि तेंव्हापासून दीपकदादांचा या कार्याशी संबंध आला तो कायमचाच! लौकिकदृष्ट्या दीपकदादांचे शिक्षण इंजिनिअरींगचे परंतु ते वं. दादांशी व त्यांच्या कार्याशी इतके एकरूप झाले होते की सेमिनारमध्ये मुलाखतींमधून मार्गदर्शन करीत. त्यांचे बोलणे इतके साधे, सुलभ सहज आकलन होईल असे होते की प्रत्येकाला ते जणु आपल्याशीच बोलत आहेत असे वाटत असे. वं. दीपकदादांची घेतलेली आरती-साधना, संमेलने म्हणजे आध्यात्मिक आनंदाची पर्वणीच होती. त्यांचे विचार ‘सुमनांजली‘ या त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून आणि वं. दादांच्या पश्चात त्यांनी लिहिलेल्या निवेदनांमधून आज आपल्याला मार्गदर्शक ठरतात.

वं. दीपकदादांच्या या कार्यातील योगदानाला तुलना नाही. असेच म्हणावे लागेल.

कार्याचा विस्तार हळूहळू वाढत होता. त्याअनुसार नाशिक, दिल्ली, पुणे येथील वारजे, सातारा, डोंबिवली, जयपूर येथे नविन कार्यकेंद्र सुरू झाली.

© www.श्री साईलीला.net all rights reserved to ।। साई अनुग्रहीत सेवा संस्था ।।